मुंबई - टीम इंडियाचमा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खेळाडूंसह अनेक राजकीय नेत्यांकडूनही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहे.
शरद पवार म्हणाले की, माझं आणि क्रिकेटंच गेल्या अनेक वर्षांपासूनचं नातं आहे. धोनीला कर्णधारपदाची जबाबदारी देतेवेळीच, तो टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल असा विश्वास आम्हाला होता, असे म्हणत शरद पवार यांनी धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटमधील धोनीचं योगदान जगातील क्रिकेटसाठी प्रेरणादायी आहे. तर, त्याने क्रिकेट जगतात बनवलेले विक्रम म्हणजे पुढील पिढ्यांसाठी उत्तम उदाहरण असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. धोनीच्या कर्णधार निवडीमध्ये शरद पवार यांचं मोठं योगदान आहे. सचिन तेंडुलकरच्या जिमखाना उद्घाटन समारोहावेळी शरद पवार आणि महेंद्रसिंह धोनी यांची मुंबईत भेट झाली होती. शरद पवार यांनी 2013 मधील या भेटीचा फोटो शेअर करत धोनीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,'' धोनीची ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.