ऑस्ट्रेलिया क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. एका डावात १० बळी घेणारा गोलंदाज पीटर अॅलन ( Peter Allan) यांचे निधन झाले. पीटर यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेटला धक्का बसला आहे. क्वीन्सलँडमध्ये १९३५ मध्ये जन्मलेले पीटर हे वेगवान गोलंदाज होते. क्वीन्सलँडसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९६५ मध्ये अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी फक्त एकच सामना खेळला असला तरी त्याची पुनरागमनाची कहाणी अप्रतिम होती. शेफिल्ड शिल्डमधील दमदार कामगिरीमुळे, १९६४-६५ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात त्यांची निवड झाली, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे या दौऱ्यावर कसोटी खेळू शकले नाही. यानंतर त्यांनी १९६५ मध्ये अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी २ विकेट घेतल्या.
मात्र दुसऱ्या कसोटीत पीटर यांना संघातून वगळण्यात आले आणि त्यांच्या जागी अॅलन कॉनोली यांना संधी मिळाली. दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर ते शेफिल्ड शिल्डमध्ये खेळण्यासाठी परतले आणि क्विन्सलँडसाठी जानेवारी १९६६ मध्ये व्हिक्टोरियाविरुद्ध पहिल्या डावात ६१ धावांत १० बळी घेतले. ऑस्ट्रेलियातील हा तिसरा सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम ठरला. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेणाऱ्या तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी ते एक होते.
१० विकेट घेतल्यानंतर पीटर यांना अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी पाचारण करण्यात आले , पण पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली नाही. अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी त्यांना दुखापत झाली. क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत ते क्वीन्सलँडकडून खेळले. निवृत्तीनंतर ते १९८५ ते १९९१ या कालावधीत क्विन्सलँड क्रिकेट असोसिएशनशीही जोडले गेले. २००० मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्स मेडल देण्यात आले.