कोलकाता - परिस्थती जर अनुकूल नसेल तर मी आपल्या चुकांवर लक्ष केंद्रित करतो, असे मत भारताचा फिरकपीटू कुलदीप यादवने व्यक्त केले. हा २६ वर्षीय खेळाडू गेल्या काही दिवसामध्ये भारतीय संघात कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अंतिम ११ खेळाडूत स्थान मिळविण्यात अपयशी ठरत आहे. त्याला अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केवळ कॅनबेरामध्ये एक वन-डे सामना खेळण्याची संधी मिळाली होती.
भारतातर्फे सहा कसोटी सामने खेळणाऱ्या या चायनामन गोलंदाजाला इंग्लंडविरुद्ध ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ खेळाडूत संधी मिळण्याची शक्यता आहे, कारण रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्यामुळे तो पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही.
कुलदीप कोलकाता नाईट रायडर्सच्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला, ‘एखाद्या वेळी चांगली कामगिरी होत नाही, अशीही वेळ येते. त्यावेळी चुकांवर लक्ष देत अनुभव मिळविण्याचा प्रयत्न असतो. या चुकांची भविष्यात पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.’
कुलदीपसाठी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) गेले दोन सत्र चांगले ठरले नाही.