Join us  

Flashback 2020 : क्रीडा विश्व हादरलं; मॅरेडोना, चेतन चौहान आदी अनेक दिग्गजांनी घेतला अखेरचा निरोप

क्रीडा विश्वही त्याला अपवाद ठरले नाही. २०२० या वर्षात अनेक दिग्गजांनी चाहत्यांचा आपला सर्वांचा निरोप घेतला. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, कोब ब्रायंट, बलबीर सिंग सीनियर, चेतन चौहान आदी दिग्गजांची एक्सिट मनाला चटका लावणारी ठरली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 24, 2020 3:28 PM

Open in App

प्रत्येक वर्ष एकतर आठवणीत ठेवण्यासारखं असतं किंवा विसरूण जाणंच चांगलं असतं... पण, २०२० हे वर्ष कितीही केल्या कुणीच विसरू शकत नाही. कोरोना व्हायरस नावाच्या संकटानं संपूर्ण जगाला वेठिस धरले. त्याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. क्रीडा विश्वही त्याला अपवाद ठरले नाही. २०२० या वर्षात अनेक दिग्गजांनी चाहत्यांचा आपला सर्वांचा निरोप घेतला. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, कोब ब्रायंट, बलबीर सिंग सीनियर, चेतन चौहान आदी दिग्गजांची एक्सिट मनाला चटका लावणारी ठरली.

कोब ब्रायंट ( Kobe Bryant; 1978 - 2020) - जगभरातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ( NBA) याची जादू भारतातही पसरत चालली आहे. मायकेल जॉर्डन, मॅजीक जॉन्सन, लॅरी बर्ड आदींनी १९९०चे दशक गाजवले. यापैकी एक दिग्गज म्हणजे कोब ब्रायंट... १९९६ ते २०१६ अशी जवळपास २० वर्षे ब्रायंटनं NBA कोर्ट गाजवलं. २६ जानेवारीला हॅलिकॉप्टर अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यासह त्याच्या १३ वर्षीय मुलगी गिएना हिचाही या अपघातात मृत्यू झाला. 

बलबिरग सिंग सीनियर ( Balbir Singh Sr. 1923 -2020) - भारताचे दिग्गज हॉकीपटू बलबिर सिंग डोसांज यांनी याचवर्षी जगाचा निरोप घेतला. १९४८ लंडन, १९५२ हेल्सींकी आणि १९५६ मेलबर्न अशा तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं आणि तीनही वेळेस सुवर्णपदक जिंकले. त्यांनी तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण २२ गोल्स केले. १९५२च्या सुवर्णपदकाच्या सामन्यात नेदरलँडविरुद्धच्या ६-१ अशा विजयात बलबिर यांनी ५ गोल्स केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक ५ वैयक्तिक गोलचा विक्रम हा त्यांच्याच नावावर आहे. १९५७मध्ये पद्म श्री पुरस्कार जिंकणारे ते पहिले खेळाडू ठरले. २५ मे २०२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजिंदर गोएल ( Rajinder Goel 1942-2020) - भारताचे महान फिरकीपटू राजिंदर गोएल यांचे या वर्षी निधन झाले. रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक ६३७ विकेट्सचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे. ७७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

चेतन चौहान ( Chetan Chauhan 1947-2020) - चेतन चौहान यांचे वयाच्या ७३व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.  1981मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले.  

 डिन जोन्स ( Dean Jones 1961-2020) - ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू डिन जोन्स यांचे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये ६०६८ धावा केल्या, तर ५२ कसोटीत ११ शतकांसह ३६३१ धावा केल्या आहेत. ते ५९ वर्षांचे होते.

चुनी गोस्वामी ( Chuni Goswami 1938-2020) - भारताचे दिग्गज फुटबॉलपटू चुनी गोस्वामी यांनी १९६०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले. ३० सामन्यांत त्यांनी ९ गोल केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. १९६२मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी नेतृत्व सांभाळले होते आणि १९६४मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील संघानं आशिया कप स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. ३० एप्रिलला वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 

दिएगो मॅराडोना ( Diego Maradona 1960-2020) - अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी बुधवारी  हृदयविकाराच्या झटक्यामुळे  निधन झाले.  १९८६ साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचे नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झाले. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही झाली. यातून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना ११ नोव्हेंबर रोजी   त्यांच्या घरी हलविण्यात आले होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९८६ चा फिफा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूची कारकीर्द जितकी शानदार तितकीच वादग्रस्त देखील ठरली. मॅरेडोनाने बोका ज्युनियर्स, नेपोली आणि बासिर्लोना या प्रख्यात संघांशिवाय अन्य संघाकडूनही खेळ केला. इंग्लंडविरुद्ध १९८६ साली झालेल्या स्पर्धेतील गोल फुटबॉलविश्व कधीही विसरू शकणार नाही. याच गोलला ‘हॅन्ड ऑफ गॉड’ असे संबोधले जाते. अनेक वर्षानंतर त्यांनी हेतूपुरस्सरपणे चेंडूला हात लावल्याची कबुली देखील दिली होती. त्याच सामन्यात त्यांनी चार मिनिटानंतर सुरेख गोल नोंदविला होता. फिफाने या गोलला फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोल संबोधले होते. 

टॅग्स :फ्लॅशबॅक २०२०भारतीय क्रिकेट संघफुटबॉलहॉकी