मेलबोर्न : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी आॅस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीतील पीडितांसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन डावांदरम्यान एक षटक फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुमारे साडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा फटकेबाजी केली. या खेळीसाठी सचिनला आॅस्ट्रेलिया महिला संघाची सुपरस्टार अष्टपैलू एलिस पॅरीने आव्हान दिले होते आणि सचिनने ते स्वीकारले होते.
सचिनला पुन्हा एकदा हातात बॅट घेतलेले बघणे चाहत्यांसाठी सुखावणारा अनुभव ठरला. मैदानावर फलंदाजी करताना हे पाच मिनिट कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेल्या त्याच्या १०० शतकांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरले. कारण त्यामुळे मिळालेली सर्व रक्कम चॅरिटीमध्ये जाणार आहे.