ठळक मुद्देयापूर्वी बीसीसीआयनं खेळाडूंनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं म्हचलं होतं.शुक्रवारी खेळाडू मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये जेवण्यासाठी गेल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय संघाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. मेलबर्नच्या एका रेस्तराँमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल हे जेवण्यासाठी गेले होते आणि त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या भारतीय चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ टिपून सोशल मीडियावर शेअर केला होता. बाहेरील जेवण या पाचही जणांना महागात पडल्याचं दिसत आहे. या पाचही जणांना आयसोलेशमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु भारतीय खेळाडूंनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्टीकरण BCCI कडून देण्यात आलं होतं. तसंच चिंता करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं BCCI च्या अधिकाऱ्यानं ANI शी बोलताना सांगितल होतं. परंतु आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या पाचही खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवल्याची माहिती पीटीआयनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हवाल्यानं दिली आहे. आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. त्यांनी कोरोनाविषयक प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं अथवा नाही याचा तपास करण्यासाठी त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलं आहे.
भारतीय संघ सध्या मेलबर्न येथे सराव करत आहे. ७ जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनी खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी, पाच खेळाडूंनी मेलबर्न येथील रेस्तराँला शुक्रवारी भेट दिली आणि तेथेच जेवणंही केलं. तेव्हा त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या भारतीय चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ टिपून सोशल मीडियावर शेअर केला. नवलदीप सिंग असे या चाहत्याचे नाव असून त्यानं ११८.६९ ऑस्ट्रेलियन डॉलर ( ६,६८३ रुपये) इतकं बिल भरल्याचा दावा केला आहे. त्यानं बिलाचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भारतीय खेळाडूंना जेव्हा हे समजलं, तेव्हा रोहितनं त्याला पैसे घेण्याची विनंती केली, असाही दावा नवलदीपनं केला. त्याचवेळी ऋषभ पंतनं मिठी मारल्याचं ट्विटही नवलदीपनं केलं होतं, परंतु त्यानं काही वेळानं यू-टर्न मारला होता.