आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी रात्रा झालेल्या लढतीत श्रीलंकेने अफगाणिस्तानवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र हा सामना सुरू असतानाच श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेलालागे याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या सामन्यादरम्यानच वेलालागे याचे वडिल सुरंगा वेलालागे यांचं कोलंबो येथे निधन झाल्याची बातमी येऊन धडकली. सामना आटोपल्यानंतर वेलालागे याला संघ व्यवस्थापनाने ही दु:खद माहिती ही कळवली. त्यानंतर तो स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला.
गुरुवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला टी-२० सामना हा दुनिथ वेलालागे याचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिलाच सामना होता. मात्र या सामन्यात अफगाणिस्तानच्या डावातील शेवटच्या षटकासाठी श्रीलंकन कर्णधाराने वेलालागे याला पाचारण केलं होतं. मात्र वेलालागे याने टाकलेल्या त्या षटकात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याने ५ षटकारांसह एकूण ३२ धावा कुटून काढल्या होत्या. मात्र याचा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला नाही. श्रीलंकन संघाने अफगाणिस्तानने दिलेले आव्हान ४ विकेट्सच्या मोबदल्यात सहजपणे पार केले होते.
मात्र वेलालागे याच्या वडिलांचं निधन झाल्याने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मिळवलेल्या सलग तिसऱ्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असलेल्या श्रीलंकन संघाच्या आनंदावर विरजण पडलं. तर वडिलांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर वेलालागे हा तातडीने मायदेशी परतला. आता स्पर्धेत तो यापुढे खेळण्याची शक्यता कमी आहे. आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर फेरीमध्ये श्रीलंकन संघ २० सप्टेंबर रोजी बांगलादेश, २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि २६ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध खेळणार आहे.
दरम्यान, वेलालागे याच्या गोलंदाजीवर ५ षटकार ठोकणाऱ्या मोहम्मद नबी यानेही वेलालागे याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.