Join us  

पाकिस्तानची धुलाई! अ‍ॅलनचे T20 सामन्यात १६ षटकार, तरीही भारतीयाचा विक्रम अबाधित

न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलनने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाच चोप दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 4:07 PM

Open in App

Finn Allen, Pakistan vs New Zealand: ड्युनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर फिन ऍलनने पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला. न्यूझीलंडच्या या फलंदाजाने शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफसारख्या वेगवान गोलंदाजांनी सज्ज असलेल्या पाकिस्तानी आक्रमणाविरुद्ध केवळ ६२ चेंडूत 137 धावा कुटल्या. यादरम्यान त्याने १६ षटकार मारले. न्यूझीलंड कडून एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला. पण त्यातही एक रंजक माहिती अशी की, तब्बल १६ षटकार मारूनही हा खेळाडू भारतीय खेळाडूपेक्षा मागेच राहिला.

भारतासह जगभरात अनेक देशात टी२० क्रिकेट खेळले जाते. पण रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंच्या नावावर टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नाही. हा विक्रम एका अशा फलंदाजाच्या नावावर आहे, ज्याचे नाव कदाचित अनेकांना माहित नसेल. तो आहे पुनीत बिश्त. तो दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि मेघालयसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. सध्या पुनीत मेघालय संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून खेळतो. पुनीत बिश्तने २०२१ साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात कहर केला होता. मेघालयकडून खेळताना त्याने मिझोरामविरुद्ध १७ षटकार ठोकले. या सामन्यात पुनीत बिश्तने ५१ चेंडूत १४६ धावा केल्या होत्या. त्याने संघाची धावसंख्या २३० धावांवर नेली आणि त्याच्या संघाने १३० धावांनी सामना जिंकला. आज फिन ऍलनने १६ षटकार ठोकले. पण पुनीत बिश्त हा सर्वाधिक षटकारांचा बाबतीत अजूनही ऍलनच्या पुढे असल्याचे दिसते.

टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने २०१७ मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्यात १८ षटकार मारून विश्वविक्रम केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेलने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला होता. त्याने IPL 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध १७ षटकार ठोकले होते. फिन ऍलनने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजरतुल्ला झझईच्या विक्रमाची बरोबरी केली.

टॅग्स :टी-20 क्रिकेटपाकिस्तानन्यूझीलंडभारत