Join us  

"विजयासाठी सहाव्या गोलंदाजाचा पर्याय शोधा; भारताकडून अपेक्षित कामगिरी नाही"

झेल सोडणे आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे अनावश्यक धावा दिल्यानंतर ३७५ धावांचे लक्ष्य आवाक्याबाहेर होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 3:24 AM

Open in App

व्ही.व्ही.एस लक्ष्मण 

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सिडनीत शुक्रवारी निराशादायी सुरुवात झाली. ही निराशा केवळ निकालामुळे नव्हे तर मैदानावर झालेल्या ढिसाळ कामगिरीचे आहे. विशेषत: पुढच्या तीन वर्षांत तीन विश्वचषकांचे आयोजन लक्षात घेता भारताकडून अशी कामगिरी अपेक्षित नाही.

झेल सोडणे आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे अनावश्यक धावा दिल्यानंतर ३७५ धावांचे लक्ष्य आवाक्याबाहेर होते. त्यातही आघाडीचे काही फलंदाज लवकर गमावणे, १५ षटकांत सहाव्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर येणे हे विजयाकडे जाण्याचे लक्षण नव्हते.हार्दिक पांड्याने मुरब्बी फलंदाजीचे दर्शन घडवले खरे पण ॲडम झम्पाने शिखरला जाळ्यात ओढताच चमत्कारच विजय मिळवून देऊ शकतो, अशी स्थिती होती.  विजयाचे श्रेय यजमान कर्णधार ॲरोन फिंचला जाते. त्याने वॉर्नरच्या सोबतीने झकास सुरुवात केलीच शिवाय स्वत: शतकी योगदान दिले. स्टीव्ह स्मिथ आणि मॅक्सवेल यांनी फुलांची आरास करावी अशी खेळी सजवून धावसंख्येला आकार दिला. पराभवामुळे संघाचे जुनेच दुखणे चव्हाट्यावर आले. रवींद्र जडेजाचा अपवाद वगळता या संघात एकतर शुद्ध फलंदाज किंवा शुद्ध गोलंदाज आहेत. म्हणजे विराटचे हात पूर्णपणे बंधनात आहेत. विजयासाठी गोलंदाजीत सहावा पर्याय शोधावा लागेल. त्यासाठी एखादा फलंदाज बाहेर काढावा लागला तरी चालेल. कर्णधाराकडे पर्याय उपलब्ध  असलेला संघ उत्कृष्ट ठरतो. सद्यस्थितीत भारताकडे असे पर्याय उपलब्ध नाहीत.

अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू डोळ्यापुढे आणल्यास मला तरी वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पांड्या, विजय शंकर आणि शिवम दुबे यांचे चेहरे दिसतात. यापैकी काहींना पाचारण करून त्यांना स्थिरावण्याची संधी द्यायला हरकत नाही. दरम्यान, हार्दिक गोलंदाजीत परतणार आहेच. सध्या मात्र त्याच्या गोलंदाजीची उणीव दूर करण्याचा पर्यायदेखील शोधायचा आहे. असे न झाल्यास चांगल्या दिवसांऐवजी वाईट दिवसांचाच सामना करण्याची वेळ येऊ शकते. 

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया