- सुनील गावसकर
मै दान सजले आहे. आता अॅक्शन सुरू होईल, पण धावा काढणे आणि गडी बाद करणे बोलण्याइतके सोपे नाही. या मालिकेद्व्रारे उत्कृष्ट कसोटी संघाचा निर्णय होईल. दोन्ही संघांनी पत्रकारांना आपली ताकद कथन केलीच आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता चुरशीचा खेळ पाहण्याची संधी मालिकेच्या निमित्ताने उपलब्ध होईल.
दोन्ही संघांना अंतिम ११ खेळाडू निवडण्याची अडचण असेलच. प्रकर्षाने गोलंदाजीचे संतुलन कसे जुळवायचे हा प्रश्न आहे. डेल स्टेन फिट असला तरी सामना खेळण्याइतपत फिट आहे का? दिवसभर मारा करण्याइतपत त्याच्यात क्षमता आहे का? खांद्याच्या दुखापतीत सुधारणा होणे सोपे नाही. चेंडूला वेग देण्याच्या प्रयत्नात डेलचा खांदा साथ देईल, हे प्रश्न यजमान संघाला भेडसावत आहेत. डेलच्या नावावर ४०० कसोटी बळी आहेत. त्याला बाहेर बसविणे परवडणारे नाही. दुसरीकडे जखमेची जोखीम पत्करून निवड करणेही सोपे नाही. त्याला ब्रेक दिल्यास पुढे काय?
भारतापुढेही समस्या आहे. कुठल्या वेगवान गोलंदाजाला वगळायचे आणि कुठल्या फिरकीपटूला निवडायचे? भुवनेश्वर आणि शमी यांच्या सोबतीला तिसरा वेगवान गोलंदाज कोण? वेगवान उमेश यादव की ईशांत शर्मा? रवींद्र जडेजा व्हायरलमुळे आजारी पडला. त्याची उणीव भरून काढण्यास आश्विन आहेच. पण जडेजा पुढे बरा झाला तर कोहली त्याला अधिक प्राधान्य देईल, यात शंका नाही.
भारतीय फलंदाजीत सलामीची जोडी निवडण्यातही अडचण आहे. मधल्या फळीला खिंडार पडल्यास अतिरिक्त फलंदाज या नात्याने रिद्धिमान साहा हा उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीय संघ तयार आहे. फिल्डिंगचे काय? भारतीय क्षेत्ररक्षकांनी लंकेच्या फलंदाजांना अनेकदा जीवदान दिल्यानंतरही आरामात विजय नोंदविले. पण येथे झेल सोडणे परवडणारे नसेल. रहाणे आणि धवन हे स्लिपमध्ये झेल टिपणारे क्षेत्ररक्षक आहेत. आफ्रिकेच्या फलंदाजांच्या उणिवा शोधून या दोघांना उभे करावे लागेल. विजय हा आत्मविश्वासाचा भाग आहे. भारतीय संघात आत्मविश्वास तर कमालीचा आहे; पण मैदानावर हा आत्मविश्वास कसा कृतीत येतो, यावर मालिकेतील भारताचे यश विसंबून असेल. (पीएमजी)