Join us  

IND vs ZIM: रोहितला भेटण्यासाठी जबरा फॅन उतरला मैदानात; पण मोजावे लागणार ६.५ लाख रूपये

भारतीय संघाने रविवारी झिम्बाब्वेचा पराभव करून ८ गुणांसह उपांत्य फेरी गाठली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 6:35 PM

Open in App

मेलबर्न : भारतीय संघाने रविवारी झिम्बाब्वेचा पराभव करून ८ गुणांसह उपांत्य फेरी गाठली आहे. खरं तर या सामन्यापूर्वीच भारताने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र आजच्या विजयामुळे भारत ब गटात अव्वल स्थानी राहिला आहे. आता रोहित सेनेचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंडविरूद्ध होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आज झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेविरूद्ध ७१ धावांनी मोठा विजय मिळवला. 

रोहितचा जबरा फॅन उतरला मैदानात या विजयासह भारतीय खेळाडूंनी संपूर्ण देशवासियांना एक मोठी भेट दिली आहे. मात्र या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या जबरा फॅनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. खरं तर झिम्बाब्वेचा डाव सुरू असताना एक फॅन रोहितला भेटण्यासाठी मैदानात आला आणि हिटमॅनला पाहताच त्याला अश्रू अनावर झाले. हातात तिरंगा घेऊन या चाहत्याने रोहित शर्माकडे धाव घेतली. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले. पण भारतीय कर्णधार रोहित शर्माने लवकरच या प्रकरणात हस्तक्षेप करून भारतीय क्रिकेट चाहत्याची विचारपूस केली आणि त्याला मैदानातून बाहेर नेण्यास सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे या चाहत्याला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६.५ लाख रूपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय संघाने तक्रार नाही केली तर चाहत्याला दिलासा मिळेल. 

सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. मात्र लोकेश राहुलने डाव सावरला आणि अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा (१५), विराट कोहली (२६), रिषभ पंत (३) आणि हार्दिक पांड्या (१८) धावा करून बाद झाला. मात्र सूर्यकुमार यादवने ताबडतोब खेळी करून २३ चेंडूत अर्धशतक झळकावले. सूर्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. सूर्यकुमारने २५ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी करून झिम्बाब्वेसमोर १८७ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. 

भारताचा मोठा विजय भारतीय संघाने दिलेल्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांना घाम फुटला. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. अखेर झिम्बाब्वेचा संघ २० षटकं देखील खेळू शकला नाही आणि १७.२ षटकांत ११५ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाने ७१ धावांनी विजय मिळवून ब गटात पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले. उपांत्य फेरीत आता भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत-झिम्बाब्वेरोहित शर्माआॅस्ट्रेलियाआयसीसी
Open in App