Fan touches Virat Kohli feet Video, Ranji Trophy : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने दीर्घ कालावधीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. २०१२ नंतर तो एकही देशांतर्गत सामना खेळलेला नव्हता. पण आज विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसला. दिल्लीचा सामना रेल्वे संघाशी आजपासून सुरु झाला. रेल्वे संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. विराटला दिल्लीत खेळताना पाहायला मिळणार म्हणून चाहत्यांनी भरपूर गर्दी केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना पाहायला चाहत्यांनी सुटीच्या दिवसासारखी गर्दी केली. त्यातच एका चाहत्याने भरमैदानात जाऊन विराटच्या पायावर लोटांगण घेतले.
चाहत्याने घेतले विराटच्या पायावर लोटांगण, पाहा VIDEO
विराटचा दिल्ली संघ फिल्डिंगसाठी मैदानात आला. सामना सुरु झाल्यानंतर विराट कोहली आणि त्याचे काही सहकारी स्लिप मध्ये फिल्डिंग करत होते. त्या वेळी स्टेडियममधील सुरक्षा कडे तोडून एक चाहता मैदानात घुसला. त्याने थेट विराटच्या दिशेने धाव घेतली. विराट अलर्ट होत थोडासा मागे सरकला. पण चाहत्याच्या मनाचा निर्धार पक्का होता. त्याने थेट विराटच्या समोर जाऊन त्याच्या पायांवर लोटांगण घातले. एखाद्या देवाचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घ्यावे त्याप्रमाणे तो चाहता विराटच्या पायावर लोटांगण घालून आशीर्वाद घेऊ लागला. तितक्यात स्टेडियममधील सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला उचलून मैदानाबाहेर नेले. याबद्दलचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
विराटच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये फुकटात एन्ट्री
विराटच्या रणजी पुनरागमनासाठी DDCA ने विशेष तयारी केली. या सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियममध्ये १०,००० चाहत्यांची आसन व्यवस्था केली गेली आहे. विशेष म्हणजे चाहत्यांसाठी मोफत प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. रणजी सामन्यांमध्ये चाहत्यांसाठी सहसा एक स्टँड उघडला जातो, परंतु या सामन्यासाठी स्टेडियमचे तीन स्टँड खुले ठेवले गेले आहेत. या सामन्यादरम्यान चाहत्यांना गेट क्रमांक १६ आणि १७ वरून स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात आहे. सुरक्षा तपासणी पास करून चाहत्यांना विनामूल्य प्रवेशिका दिल्या जात आहेत. स्टेडियममध्ये जाण्यासाठी चाहत्यांना त्यांचे आधार कार्ड सोबत आणावे लागेल आणि आणखी एखादा फोटो आयडी प्रूफ सोबत ठेवावा लागेल असे सांगण्यात आले आहे.