Rohit Sharma Bronco Test : भारतीय संघाचे दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आता ते दोघे केवळ वनडे सामनेच खेळणार आहेत. सध्या आशिया कप स्पर्धेची लगबग सुरू आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेत रोहित आणि विराट खेळताना दिसणार आहेत. तसेच, २०२७ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची दोघांनीही इच्छा दर्शवली आहे. पण, भारतीय क्रिकेट मंडळ आणि संघ व्यवस्थापन या दोन वर्षांनंतरच्या स्पर्धेसाठी दोघांना संघात घेणार का, याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
"२०२७च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने विचार करायचे झाल्यास विराट कोहलीला संघातून बाहेर ठेवणे खूप कठीण आहे. त्याचा फिटनेसही खूपच चांगला आहे. पण मला रोहित शर्माबाबत थोडी शंका आहे. मला ठाम विश्वास आहे की, यो-यो टेस्टच्या जागी आणलेली ब्राँको टेस्ट ही अशाच खेळाडूंना संघातून बाहेर ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ब्राँको टेस्टचे स्वरूप पाहता असे दिसते की, ही टेस्ट काही वरिष्ठ खेळाडूंना संघात राहणे कठीण व्हावे यासाठीच ठेवण्यात आली आहे," असे मनोज तिवारी म्हणाला.
त्याने नव्या टेस्टच्या टायमिंगवरूनही प्रश्न उपस्थित केले. "ब्राँको टेस्ट आताच का आणली? सिलेक्शनसाठी ही टेस्ट आणण्याचा निर्णय कुणी घेतला? आताच काहीही अंदाज बांधणं कठीण आहे. पण असे दिसून येते की, रोहितसारख्या खेळाडूंना या टेस्टमुळे संघात स्थान मिळवणे कठीण होईल. त्यांना फिटनेसवर थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल. २०११ विश्वचषकानंतरही अशाच प्रकारे यो-यो टेस्ट आणण्यात आली होती. त्यावेळी सेहवाग, युवराज, गंभीर हे खेळाडू चांगले खेळत होते. पण नव्या टेस्टमुळे फिटनेसची व्याख्या बदलली आणि काही खेळाडू संघाबाहेर झाले," असे तिवारीने अधोरेखित केले.