ICC Men's Test Batting Rankings : ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली खरी, परंतु त्यांच्या फलंदाजांना तितकीशा साजेशी कामगिरी या लढतीत करता आली नाही. त्याचा फटका त्यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत बसलेला पाहायला मिळाला. या कसोटीपूर्वी मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ व ट्रॅव्हिस हेड हे तीन ऑसी खेळाडू फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल तीन क्रमांकावर होते. ३९ वर्षांनंतर एकाच संघाचे तीन फलंदाज क्रमवारीत आघाडीवर घडले होते, परंतु इंग्लंडच्या जो रूटने ( Joe Root) या त्रिरत्नांना दणका दिला. मार्नस लाबुशेनने कसोटी फलंदाजांमधील अव्वल स्थान गमावले अन् आता जो रूट नंबर वन फलंदाज बनला आहे.
या कसोटीपूर्वी मार्नस लाबुशेन ( ९०३ रेटीगं पॉईंट्स), स्टीव्ह स्मिथ ( ८८५ रेटीगं पॉईंट्स) व ट्रॅव्हिस हेडने ( ८८४ रेटीगं पॉईंट्स) हे ऑसी फलंदाज अव्वल तीन क्रमांकावर होते. १९८४ मध्ये एकाच संघाचे तीन फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल तीन स्थानी राहिले होते. तेव्हा गॉर्डन ग्रिनीज ( ८१०), क्लाईव्ह लॉईड ( ७८७) आणि लॅरी गोमेस ( ७७३) हे वेस्ट इंडिजचे तीन फलंदाज टॉपला होते. पण, अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात लाबुसेनला काही खास करता आले नाही आणि सहा महिन्यांपासून ताब्यात असलेले अव्वल स्थान त्याने गमावले.

तेच रुटने या सामन्यात ३०वे कसोटी शतक झळकावले होते. त्याने दोन्ही डावांत ११८* आणि ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याचा फायदा ३२ वर्षीय फलंदाजाला झाला अन् त्याने पाच स्थानांची झेप घेत थेट अव्वल स्थान पटकावले. लाबुशेन ( ० व १३ धावा) अपयाशामुळे तिसऱ्या क्रमांकावर गेला. न्यूझीलंडचा केन विलियम्सन अचानक दोन स्थानांच्या सुधारणेसह दुसऱ्या क्रमांकावर आला. ट्रॅव्हीस हेड चौथ्या व स्टीव्ह स्मिथ सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने बर्मिंगहॅम कसोटी गाजवली. ३६ वर्षीय ख्वाजाने पहिल्या डावात १४१ आणि दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. त्याने पाच स्थानांच्या सुधारणेसह १३वे स्थान पटकावले.
भारतीयांची कामगिरी....
भारताचा रिषभ पंत दहावे स्थान पकडून आहे. रोहित शर्मा १२ व्या स्थानी कायम आहे, तर विराट कोहलीची चौद्याव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. चेतेश्वर पुजारा २५व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये आर अश्विन अव्वल स्थानावर आहे, तर जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा अनुक्रमे आठव्या व नवव्या स्थानावर आहेत अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी अव्वल दोन क्रमांक टिकवले आहेत, तर अक्षर पटेल चौथ्या स्थानावर आहे.