भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकला. ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने २४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या जोडीने इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला टी-२० सामन्यांमध्ये ही जोडी सर्वाधिक धावा करणारी जोडी ठरली आहे.
आंतराराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या जोडीने आतापर्यंत एकूण २ हजार ७२६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि बेथ मुनी यांच्या जोडीने एकूण २ हजार ७२० धावा केल्या आहेत. या यादीत न्यूझीलंडची सुझी बेट्स आणि सोफी डेव्हाईन ही जोडी तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांच्या नावावर २ हजार ५५६ धावांची नोंद आहे. या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या ईशा ओझा आणि तीर्था सतीश या जोडीने आतापर्यंत यूएईसाठी एकूण १९८५ धावा केल्या आहेत. तर, पाचव्या स्थानावर असलेल्या कविशा एगोडेज आणि ईशा ओझा या जोडीने यूएईसाठी एकूण १ हजार ९७६ धावा केल्या आहेत.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकांत चार विकेट गमावत १८१ धावा केल्या. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी अवघ्या ३१ धावांत तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर मिमा रॉड्रिग्जने अमनजोत कौरसोबत चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी रचली. जेमिमा ६३ धावा करून बाद झाली, ज्यात नऊ षटकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. अमनजोतने रिचा घोषसोबत पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. अमनजोतने ४० चेंडूत ६३ धावा केल्या. तर, रिचाने २० चेंडूत ३२ धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडकडून लॉरेन बेलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या, तर लॉरेन फाइलर आणि एम. आर्लॉटने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाचा सुरुवात खराब झाली. इंग्लंडने अवघ्या १७ धावांत तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर टॅमी ब्यूमोंटने एमी जोन्ससोबत ७० धावा जोडल्या. ५ चेंडूत ५४ धावा करून टॅमी बाद झाली. एमी जोन्सने २७ चेंडूत ३२ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सोफी स्केल्टनने २३ चेंडूत ३५ धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.भारताकडून श्री चरणीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने प्रत्येकी एक विकेट घेतली. बॅट आणि बॉलने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमनजोतची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड झाली.