India Women vs England Women: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद १४३ धावा आणि जलदगती गोलंदाज रेणूका सिंह ठाकूरच्या ४ विकेट्सच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघानं बुधवारी सेंट लॉरेन्स ग्राऊंडवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८८ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. भारतीय संघानं पहिला सामना सात विकट्सनं जिंकला होता, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८८ धावांनी विजय मिळवला.
भारतीय महिला क्रिकेट संघानं यापूर्वी १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये मालिका जिंकली होती. इंग्लंडच्या संघानं सामन्यात टॉस जिंकत पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय खेळाडूंच्या तुफान फटकेबाजीनं ३३३ धावांचा विशाल स्कोअर उभा केला. इंग्लंडच्या संघाला संपूर्ण ५० ओव्हर्सही खेळता आलेल्या नाही. तसंच ४४.२ ओव्हर्सचा सामना करत २४५ धावांवर संपूर्ण टीम माघारी परतली.
इंग्लंडच्या टीमकडून डॅनिअल व्याटनं सर्वाधिक ६५ धावा केल्या. एलिसे केप्ली आणि एमी जोन्सनं ३९-३९ धावा केल्या. भारतीय संघाकडून रेणूकाच्या चार विकेट्सशिवाय दीप्ती शर्मा आणि डी हेमलता यांनी एक एक विकेट घेतली.
हरमनप्रीत कौरचं पाचवं शतक
भारतीय क्रिकेट संघानं ५० षटकांमध्ये ३३३ धावा ठोकल्या. भारतीय संघाला इथवर पोहोचवण्यात कर्णधार हरमनप्रीत कौरचा मोठा वाटा आहे. तिनं नाबाद १४३ धावा करत एकदिवसीय सामन्यांमधलं आपलं पाचवं शतक ठोकलं. तिनं १११ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीनं शतक ठोकलं.