Rishabh Pant Injured : मँचेस्टर कसोटी आधी दुखापतीनं त्रस्त असलेल्या टीम इंडियाला सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात मोठा धक्का बसला आहे. बॅटिंग वेळी चेंडू पायाला लागून झालेल्या दुखापतीमुळे पंतवर मैदान सोडण्याची वेळ आली. लॉर्ड्सच्या मैदानातही पंतला दुखापत झाली होती. विकेट मागे बुमराहचा चेंडू बोटाला लागल्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे तो फक्त बॅटिंग करताना दिसून आले. आता चौथ्या कसोटी सामन्यात बॅटिंग वेळी त्याला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!रिव्हर्स स्वीप शॉट्स मारण्याच्या नादात पायाला चेंडू लागला अन्...
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ६८ व्या षटकातील क्रिस वोक्सच्या चौथ्या चेंडूवर पंतनं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊनं त्याच्या उजव्या पायाच्या करंगळी जवळील भागावर लागला. त्यानंतर पंतला वेदना असह्य झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला पाय जमिनीवरही टेकता येत नव्हता. लंगडत लंगडतच तो खेळपट्टीवरून बाजूला आला. फिजिओ मैदानात आल्यावर सॉक्स काढून ज्यावेळी पाहिले त्यावेळी त्याचा पाय सुजल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर रक्तही येत होते. मग मिनी अँम्बुलन्समधून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
'रिटायर्ड हर्ट' पंतला स्कॅनिंगला नेण्याची वेळ
साई सुदर्शन आणि रिषभ पंत जोडी जमली होती. पंत चांगली फटकेबाजी करतानाही दिसत होते. पण जोखीम घेऊन उलट फटका मारण्याच्या नादात दुखापतीचा मोठा फटका बसला. 'रिटायर्ड हर्ट' झाला त्यावेळी तो ४८ चेंडूत ३७ धावांवर खेळत होता. त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आले असून रिपोर्ट्सनंतरच त्याची दुखापत किती गंभीर आहे ते समोर येईल.
बॅटिंगमध्ये महत्त्वाची जबाबदारी
रिषभ पंत हा भारतीय फलंदाजीतील ताकद आहे. मोठ्या फटकेबाजीसह तो आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामना फिरवू शकतो. दुखापत गंभीर असेल तर विकेटमागे ध्रुव जुरेलचा पर्याय टीम इंडियाकडे असेल. पण नियमानुसार त्याला बॅटिंग करता येणार नाही. परिणामी टीम इंडियाच्या फलंदाजीत मोठी पोकळी निर्माण होईल.