England vs India, 2nd Test Shubman Gill Double Century : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलनं नवा इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने द्विशतक झळकावले आहे. इंग्लंडच्या मैदानात लीटल मास्टर सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर द्विशतक झळकवणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SENA देशात 'द्विशतक' झळकवणारा ठरला पहिला आशियाई कर्णधार
या द्विशतकी खेळीसह शुबमन गिलनं टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा विक्रम मागे टाकला आहे. शुबमन गिल हा सेना देशांत द्विशतकी खेळी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. १९९० मध्ये ऑकलंडच्या मैदानात भारतीय संघाचे नेतृत्व करताना अझरुद्दीन याने १९२ धावांची खेळी केली होती. ही SENA देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती. आता शुबमन गिल टीम इंडियाचा नंबर वन कर्णधार ठरलाय. एवढेच नाहीतर सेना देशांत द्विशतकी खेळी करणारा तो आशियाई देशांतील पहिला कर्णधारही ठरलाय.
शुबमन गिल ते सचिन तेंडुलकर! SENA देशांत टेस्टमध्ये बेस्ट इनिंग खेळणारे भारतीय कॅप्टन
विक्रमी खेळीसह शुबमन गिलनं मारली द्रविड गावसकरांच्या क्लबमध्ये एन्ट्री
इंग्लंडच्या मैदानात द्विशतकी खेळी करणारा शुबमन गिल हा तिसरा भारतीय फलंदाज आहे. १९७९ मध्ये ओवलच्या मैदानात लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी २२१ धावांची खेळी केली होती. ओवलच्या मैदानातच २००२ च्या इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविडच्या भात्यातून २१७ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. या दिग्गजांच्या यादीत आता गिलनं एन्ट्री मारली आहे. एवढेच नाही गावसकरांना मागे टाकत इंग्लंडच्या मैदानातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे.
कॅप्टन्सी मिळाली अन् सर्वोत्तम खेळीचा सिलसिला
इंग्लंड दौऱ्यासाठी शुबमन गिलवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. कारण इंग्लंडमध्ये त्याचा रेकॉर्ड एकदम खराब होता. रोहित शर्मा विराट कोहली या दिग्गजांच्या अनुपस्थितीत इंग्लंडमधील चॅलेंज आणि नव्या जबाबदारीसह फलंदाजीतील रेकॉर्ड सुधारण्याचे चॅलेंज घेऊन त्याने इंग्लंड दौऱ्याला सुरुवात केली. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पहिल्यांदाच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १४७ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात द्विशतकी खेळीसह त्याने सर्वोत्तम खेळीचा सिलसिला कायम ठेवला आहे.