England vs India, 1st Test Day 1 Stumps : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नव्या पर्वाची सुरुवात एकदम दाबात केलीये. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल शुबमन गिलसाठी अशुभ ठरला. बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या सत्रात संयम दाखवणार का? हा मोठा प्रश्न होता. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल जोडीनं आपल्या बॅटनं याचं अगदी उत्तम उत्तर दिले. दोघांनी संयमी खेळी करत पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचत भक्कम पाया रचला. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी पहिल्या दिवसाच्या खेळात झळकवलेली शतके अन् रिषभ पंतचे अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवशी ३ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर ३५९ धावा लावल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी...
पहिल्या दिवसाच्या खेळात जे चित्र दिसलं तो फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर तर अजून बाकी आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शुबमन गिल द्विशतकाच्या तर रिषभ पंत हा शतकाच्या दिशेनं वाटचाल करतोय. करुण नायर अजून खेळायला यायचा आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर ही मंडळीही तुफान फटकेबाजीसह मोठी धावसंख्या उभारण्यासाठी उपयुक्त खेळी करु शकतात. एवढेच नाही तर पहिल्या दिवसातील तीन सत्रांचा खेळ हा भारतीय संघाने गाजवला. जो संघ तीन सत्र गाजवतो तो पराभूत होण्याचा प्रश्नच उरत नाही. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वाची सुरुवात भारतीय संघाने एकदम सुरेख केली असून पहिल्या दिवसाचा खेळ पाहिल्यावर हा सामनाच नाही तर मालिका जिंकण्याची धमकही या संघात असल्याचे दिसून येते.
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
सलामी जोडीनं करून दिली दमदार सुरुवात
यशस्वी जेस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी अगदी संयमी खेळी करत दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. ही जोडी शतकी भागीदारी रचण्याच्या उंबरठ्यावर असताना ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल फसला. त्याने ७८ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ४२ धावांची उपयक्त खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या साई सुदर्शनला बेन स्टोक्सनं खातेही उघडू दिले नाही. ठराविक अंताराने पडलेल्या या विकेट्स सोडल्या तर पहिल्या दिवसात टीम इंडियाच्या फलंदाजांचाच दबदबा दिसून आला.
बेन स्टोक्सनंच फोडली जैस्वाल-गिल सेट झालेली जोडी
लोकेश राहुल आणि साई सुदर्शन यांच्या स्वरुपात पहिल्या दोन विकेट्स गमावल्यावर यशस्वी जैस्वाल याने कर्णधार शुबमन गिलच्या साथीनं १२९ धावांची दमदार भागीदारी रचली. शतकी खेळीनंतर बेन स्टोक्सनं यशस्वी जैस्वालच्या खेळीला ब्रेक लावला. युवा सलामीवीरानं १५९ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची खेळी साकारली.
मग जमली कॅप्टन-उप कॅप्टनची जोडी
यशस्वी जैस्वालच्या रुपात भारतीय संघाने २२१ धावांवर तिसरी विकेट गमावली होती. त्यानंतर कर्णधार शुबमन गिलची साथ द्यायला उप कर्णधार रिषभ पंत मैदानात उतरला. या जोडीनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताकडून सर्वोच्च भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने ३ बाद ३५९ धावा केल्या होत्या. शुबमन गिल १७५ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १२७ धावांवर नाबाद होता. दुसऱ्या बाजूला रिषभ पंतनंही नाबाद अर्धशतक झळकावले. पंतनं १०२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६५ धावांवर खेळत होता.