Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फलंदाजांविरुद्ध इंग्लंडच्या फिरकीपटूंची कसोटी : जयवर्धने

जयवर्धनेने यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोचा संघात समावेश न करण्यात आल्यामुळे निराशा व्यक्त केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 23:36 IST

Open in App

लंडन : इंग्लंडचे फिरकीपटू डॉम बेस व जॅक लीच अलीकडेच संपलेल्या मालिकेत श्रीलंकेच्या फलंदाजांवर आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरले, पण श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्या मते भारताविरुद्ध पाच फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांना खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

डावखुरा फिरकीपटू लीचने दोन सामन्यांच्या मालिकेत १० तर ऑफ स्पिनर बेसने १२ बळी घेतले. इंग्लंडने ही मालिका २-० ने जिंकली.जयवर्धने म्हणाला, ‘माझ्या मते, ही शानदार मालिका होईल. येथे या खेळाडूंना चांगले आव्हान मिळेल. याचेच नाव क्रिकेट आहे. तुम्हाला विदेशात कसोटी मालिका जिंकाव्या लागतात.’

जयवर्धने पुढे म्हणाला, ‘या दोन फिरकीपटूंनी (बेस व लीच) येथे बराच अनुभव मिळविला आहे, पण भारतात त्यांच्यापुढे आव्हान राहील.’भारताविरुद्धच्या मालिकेसाठी सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्सचाही इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे, पण जयवर्धने म्हणाला की, त्याच्यासाठी हे आव्हान सोपे नाही. रोरी बर्न्सपुढे डावाची सुरुवात करण्याचे आव्हान राहील. त्याने अलीकडच्या कालावधीत फारसे क्रिकेट खेळलेले नाही.’ 

जयवर्धनेने यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोचा संघात समावेश न करण्यात आल्यामुळे निराशा व्यक्त केली. जयवर्धने म्हणाला, ‘तो अनुभवी असून विशेषत: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याची फलंदाजी बघता त्याला संघात संधी मिळायला हवी होती.’ केव्हिन पीटरसननेही बेयरस्टोचा संघात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

स्टोक्सचे पुनरागमन इंग्लंडसाठी लाभदायकजयवर्धनने सांगितले की इंग्लंड भारताविरुद्धच्या मालिकेसाठी चांगल्याप्रकारे सज्ज आहे. विशेषत: त्यांना या मालिकेत अष्टपैलू बेन स्टोक्स व वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांची सेवा मिळेल. स्टोक्स व आर्चर यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ‌‌विश्रांती देण्यात आली होती.‘बेन स्टोक्सचे पुनरागमन इंग्लंडसाठी लाभदायक ठरेल. कारण तो अनुभवी असून त्यांच्या आघाडीच्या फळीत आणखी एका फलंदाजाची भर पडणार आहे. जोफ्रा आर्चर आपल्या वेगाने संथ खेळपट्ट्यांवर विशेष काही करू शकतो. एकूण विचार करता ते चांगल्याप्रकारे तयार आहेत.’

टॅग्स :भारतइंग्लंड