Join us

ट्वेंटी-२० मध्ये वर्चस्व गाजवणारा इंग्लंडचा स्टार निवृत्त; अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, कारण...

Dawid Malan Retirement : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणारा इंग्लंडचा स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:25 IST

Open in App

इंग्लंडचा स्टार खेळाडू डेव्हिड मलानने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. एकेकाळी ट्वेंटी-२० क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहणारा मलान बराच काळ संधीच्या शोधात होता. सातत्याने इंग्लिश संघातून त्याला डावलले गेले. आता ३७ वर्षीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली. वन डे विश्वचषक २०२३ पासून तो इंग्लंडच्या संघातून बाहेर होता. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी नसली तरी प्रभावी नक्कीच राहिली. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मलानच्या नावावर १८०० धावांची नोंद आहे. तर वन डे क्रिकेटमध्ये त्याने १४०० धावा केल्या आहेत. 

डेव्हिड मलानने २२ कसोटी सामने खेळले असून, यादरम्यान त्याला १०७४ धावा करता आल्या. याशिवाय त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली. वन डे क्रिकेटमध्ये त्याने ६ शतके आणि सातवेळा अर्धशतकी खेळी केली. ट्वेंटी-२० मधील स्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. त्याने या फॉरमॅटमध्ये १ शतक आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील मलानला प्रभावी कामगिरी करण्यात यश आले. 

दरम्यान, जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग असलेल्या आयपीएलमध्येही डेव्हिड मलान खेळला आहे. त्याने २०२१ मध्ये पंजाब किंग्जच्या संघासाठी एक सामना खेळला होता. पण, त्याला या सामन्यात केवळ २६ धावा करता आल्या. त्यानंतर तो आयपीएलमध्ये दिसला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला मलान देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकतो. मलानने जुलै २०१७ मध्ये इंग्लंडच्या संघात पदार्पण केले. २०२२ मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मे २०१९ मध्ये वन डेमध्ये पदार्पण करणाऱ्या मलानने या फॉरमॅटमधील त्याचा शेवटचा सामना नोव्हेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. 

टॅग्स :इंग्लंडटी-20 क्रिकेटआंतरराष्ट्रीय क्रिकेट