England Lions vs India A,1st Unofficial Test Karun Nair Double Century : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी भारतीय 'अ' संघ इंग्लंड दौऱ्यावर अनौपचारिक कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरला आहे. इंग्लंड लायन्स विरुद्धच्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात करुण नायरनं संधीच सोनं करून दाखवत द्विशतक झळकावले आहे. या सामन्यात करुण नायरनं २८१ चेंडूत २०४ धावांची दमदार खेळी केली. त्याची ही खेळी २६ चौकारासह एका षटकाराने बहरली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना एक कॅच सुटला, मग....
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी करुण नायरनं शतकाला गवसणी घालत आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. ८९ धावांवर त्याला अजित सिंह डेलच्या गोलंदाजीवर जीवनदान मिळाले. स्लिपमध्ये त्याचा कॅच सुटला अन् मग इंग्लंड लायन्सवर भारी पडला. पहिल्या दिवसाच्या खेळात नाबाद १८२ धावा करणाऱ्या करून नायरनं दुसऱ्या दिवसाच्या खेळात शानदार द्विशतक झळकावले.
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
कसोटीत त्रिशतक झळकवणारा दुसरा भारतीय
करुण नायर याने २६ नोव्हेंबर २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी मालिकेतून कसोटीत पदार्पण केले होते. या मालिकेत त्याने त्रिशतकही झळकावले. विरेंद्र सेहवाग याच्यानंतर कसोटीत त्रिशथक झळकवणारा तो दुसरा भारतीय आहे. पण ६ सामन्यानंतर त्याच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक लागला. त्याला भारतीय संघातून डावलण्यात आले. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर त्याला टीम इंडियात संधीच मिळाली नाही.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा काढून मारलीये टीम इंडियात एन्ट्री
पुन्हा टीम इंडियाकडून कमबॅक करण्यासाठी या गड्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या भात्यातील धमक दाखवली. विदर्भ संघाकडून अक्षरश: खोऱ्यानं धावा काढत त्यानं निवडकर्त्यांचे लक्षवेधून घेतले. विदर्भ क्रिकेट संघाकडून धमाकेदार कामगिरीनंतर त्याने कमबॅकसाठी ट्विटमधून व्यक्त केलेली तळमळ चर्चेचा विषय ठरली. "प्रिय क्रिकेट मला आणखी एक संधी हवी." या आशयाच्या ट्विटनं त्याला आधी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून कमबॅकची संधी मिळाली. इथं पहिल्याच सामन्यात त्याने तेवर दाखवून दिले. मग इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय 'अ' संघासह मुख्य संघातही निवड झाली. २० जून पासून रंगणाऱ्या कसोटी आधी भारतीय 'अ' संघाकडून दमदार द्विशतक झळकवत इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी तयार असल्याचे संकेतच त्याने दिले आहेत.
किंग कोहलीच्या जागेवर टाकला रुमाल
इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले. आधी रोहित शर्मा आणि त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या दौऱ्यात विराट कोहलीची जागा कोण घेणार? हा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर होता. त्याचे उत्तर करुण नायरनं द्विशतकी खेळीसह दिले आहे. विराट कोहलीच्या जागेवर त्याने रुमाल टाकलाय असं म्हणायला हरकत नाही. विराट कोहली हा भारतीय कसोटी संघात चौथ्या क्रमांकावर खेळायचा. ही जबाबदारी पेलण्यासाठी करुण नायर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.