- सौरव गांगुली लिहितात...
लॉर्ड््सवरील आज, रविवारची सायंकाळ संस्मरणीय ठरेल. येथे प्रथमच (इंग्लंड किंवा न्यूझीलंड) एक संघ विश्वविजेतेपदाचा जल्लोष करताना दिसेल. यापूर्वी इंग्लंडला तीनदा (१९७५, ८७ व ९२) जेतेपद पटकाविण्याची संधी होती; पण त्यात ते अपयशी ठरले. आता २७ वर्षांनंतर त्यांना मायदेशात ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. हा आनंदाचा क्षण केवळ खेळाडू किंवा त्यांच्या कुटुंबीयांपुरता मर्यादित राहणार नसून, त्या इंग्लिश चाहत्यांसाठी राहील. ते अनेक वर्षांपासून आपल्या संघाला चॅम्पियन ठरताना बघण्यास इच्छुक आहेत.
चार वर्षांपूर्वी आॅस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर माजी कर्णधार अॅण्ड्य्रू स्ट्रॉसच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने वन-डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणामही दिसला. संघाने सातत्याने चमकदार कामगिरी करताना स्वत:ला प्रबळ दावेदार म्हणून सिद्ध केले. लॉर्ड््सच्या बाल्कनीमध्ये चमकदार चषकासह पूर्ण संघाला बघण्याचा आनंद काही वेगळाच असेल.
इंग्लंड मजबूत संघ आहे. नव्या चेंडूने व्होक्स-आर्चर जोडी लॉर्ड््सच्या ढगाळ वातावरणात वर्चस्व गाजवू शकतात. भेदक माऱ्यासह संघाकडे रॉय व बेयरस्टॉ ही आक्रमक सलामी जोडी आहे. ही जोडी सध्या शानदार फॉर्मात आहे. त्यानंतर रुट, मॉर्गन, स्टोक्स, बटलर यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. फलंदाजीत सातत्य राखल्यामुळेच संघाने गेल्या काही वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये ३५० पेक्षा अधिक धावांचे स्कोअर नोंदविले आहेत.
न्यूझीलंड २०१५ नंतर दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, त्यांना आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. ते दुसºयांदा यजमान संघाविरुद्ध अंतिम फेरीत खेळणार आहेत. पहिल्या उपांत्य लढतीत भारताचा पराभव केल्यानंतर संघाला विश्रांतीची पुरेशी संधी मिळाली आहे. उपांत्य फेरीचा तणाव घालविण्यासाठी विश्रांती आवश्यक होती. न्यूझीलंड नक्कीच चांगला संघ आहे. ते भारताचा पराभव करीत अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. अशा स्थितीत त्यांना कमकुवत समजणे चुकीचे ठरू शकते. ‘कूल’ कर्णधार विलियम्सन संघाची ताकद आहे; पण त्यांची फलंदाजीच रविवारचा चॅम्पियन निश्चित करेल. (गेमप्लॅन)