Join us

ENG vs NZ: न्यूझीलंडविरूद्धच्या इंग्लंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; जाणून घ्या सेमीफायनलचं गणित

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 17:24 IST

Open in App

ब्रिस्बेन : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना पार पडला. अटीतटीच्या लढतीत इंग्लिश संघाने बाजी मारून गुणतालिकेत मोठी झेप घेतली. हे दोन्हीही संघ अ गटात असून आजच्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंडचा मोठा फायदा झाला आहे. इंग्लिश संघाने 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 179 धावा उभारल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना किवी संघाला अपयश आले. खरं तर इंग्लंडच्या या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या 5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश संघाने आपल्या कर्णधाराच निर्णय योग्य ठरवत शानदार सुरूवात केली आहे. खुद्द कर्णधार जोस बटलरने 47 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. लेक्स हेल्सने (52) अर्धशतकी खेळी करून किवी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याच इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडकडून मिचेल सॅंटनरचा अपवाद वगळला तर सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 2 बळी पटकावले तर टीम साउदी, मिचेल सॅंटनर आणि ईश सोधी यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. 

इंग्लंडने दिलेल्या 180 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर डेव्होन कॉनवे (3) धावा करून तंबूत परतला. कर्णधार केन विलियमसनने 40 चेंडूत 40 धावांची सावध खेळी केली मात्र त्यालाही खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. ग्लेन फिलिप्सने 36 चेंडूत 62 धावांची ताबडतोब खेळी करून किवी संघाचे सामन्यात पुनरागमन केले मात्र सॅम करणने न्यूझीलंडच्या आशेवर पाणी टाकले. किवी संघाच्या मधल्या फळीने इंग्लिश गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. अखेर इंग्लंडने 20 धावांनी शानदार विजय मिळवला. न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 6 बाद केवळ 159 धावा करू शकला. 

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये चुरस इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला. ख्रिस वोक्स आणि सॅम करण यांनी सर्वाधिक 2-2 बळी पटकावले. तर बेन स्टोक्स आणि मार्क वुड यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंडच्या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका बसला आहे. कारण इंग्लिश संघ आता 5 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. खरं तर अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाचे समान 5 गुण आहेत. मात्र किवी संघाचा नेटरनरेट चांगला आहे. ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अखेरच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना 4 तारखेला अफगाणिस्तानसोबत होणार आहे, तर इंग्लंडचा पुढचा सामना 5 तारखेला श्रीलंकेसोबत होणार आहे.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२इंग्लंडन्यूझीलंडआॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App