Phil Salt Smashes Record Breaking Ton England Set New Record With 304 Runs In T20I : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टनं विक्रमी शतक झळकावले. संघाच्या डावाची सुरुवात करताना वादळी खेळीचा नजराणा पेश करताना त्याने ३९ चेंडूत शतक साजरे केले. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात इंग्लंडकडून सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सॉल्टनं लायम लिविंगस्टोनला टाकलं मागे
सॉल्टच्या वादळी खेळी आधी इंग्लंडच्या ताफ्यातून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम हा लायम लिविंगस्टोनच्या नावे होते. त्याने २०२१ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात ४२ चेंडूत शतक झळकावले होते. आपल्या सहकाऱ्याला मागे टाकत सॉल्ट टी-२०I मध्ये इंग्लंडचा फास्टेस्ट सेंच्युरीयन ठरला आहे.
३०० पारची लढाई... इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सॉल्टनं ६० चेंडूत नाबाद १४१ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याच्या भात्यातून १५ चौकार आणि ८ षटकार पाहायला मिळाले. त्याच्या या खेळीशिवाय जोस बटलरनं ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ३० चेंडूत ८३ धावा कुटल्या. जेकब बेथेल १४ चेंडूत २६ धावा करून परतल्यावर कर्णधार हॅरी ब्रूकनं २१ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी करत सॉल्टच्या साथीनं संघाच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात २ बाद ३०४ धावा लावल्या. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी हा विक्रम टीम इंडियाच्या नावे होता. भारतीय संघाने २०२४ मध्ये हैदराबादच्या मैदानात बांगलादेश विरुद्धच्या टी-२०सामन्यात ६ बाद २९७ धावा केल्या होत्या. हा विक्रम इंग्लंडच्या संघाने मोडीत काढला आहे.
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
फुल मेंबर संघाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
- ३०४/२ – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मँचेस्टर, २०२५
- २९७/६ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
- २८३/१ – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहॅन्सबर्ग, २०२४
- २७८/३ – अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, देहरादून, २०१९
- २६७/३ – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, तारौबा, २०२३
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा झिम्बाब्वेच्या नावे आहे. २०२४ मध्येत्यांनी गॅम्बिया विरुद्धच्या सामन्यात २०षटकात ३४४ धावा कुटल्या होत्या. त्यापाठोपाठ या यादीत नेपाळच्या संघाचा नंबर लागतो. २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध त्यांनी ३१४ धावा केल्या होत्या. या दोन संघापाठोपाठ इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
- ३४४/४ – झिंबाब्वे विरुद्ध गांबिया, नैरोबी, २०२४
- ३१४/३ – नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, २०२३
- ३०४/२ – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मँचेस्टर, २०२५
- २९७/६ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
- २८६/५ – झिंबाब्वे विरुद्ध सेशेल्स, नैरोबी, २०२४