इंग्लंड-भारत यांच्यातील लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील सामना अतिशय रंगतदार स्थितीत पोहचला आहे. भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघासमोर ३७१ धावांचे आव्हान ठेवले अशून चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने बिन बाद २१ धावा केल्या होत्या. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंड संघासमोर ३५० धावा करायच्या असून दुसऱ्या बाजूला विजयासाठी टीम इंडियाला १० विके्टस मिळवायच्या आहेत. पावसाचा व्यत्यय आला नाही तर हा सामना शंभर टक्के निकाली लागेल, सध्याच्या घडीला दोन्ही संघासाठी समान संधी आहे. इथं जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी इंग्लंडसाठी जमेची बाजू ठरतात अन् भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा लागेल? यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही आहे यजमान इंग्लंडची जमेची बाजू, पण...
इंग्लंडच्या संघाने घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात ३ वेळा ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला आहे. यातील दोन विजय त्यांनी लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातच मिळवले होते. २००१ मध्ये हेडिंग्लेच्या मैदानात त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३१५ धावांचा यशस्वी पाठलाग केल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय २०१९ मध्ये इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला होता. एवढेच नाहीतर २०२२ मध्ये इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाविरुद्ध ३७८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. पण हा सामना बर्मिंघमच्या मैदानात झाला होता. हेडिंग्लेच्या मैदानात अखेरच्या दिवशी ३५० धावा करणं सोपी गोष्ट नसेल.
... अन् ५ शतकांच्या जोरावर टीम इंडियानं रचला इतिहास; असं पहिल्यांदाच घडलं!
टीम इंडियाला जपावा लागेल हा मंत्र!
सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह हाच टीम इंडियाची विजयाची गॅरेंटी आहे. पहिल्या डावात बुमराहनं आपली जादू दाखवून दिलीये. दुसऱ्या डावातही त्याच्या गोलंदाजीतील धमक दिसेल, ही अपेक्षा आहे. इंग्लंडच्या संघाला रोखून हेडिंग्लेचं मैदान मारायचं असेल तर टीम इंडियातील अन्य गोलंदाजांना जसप्रीत बुमराहला उत्तम साथ द्यावी लागेल. दुसऱ्या बाजूनं दबाव निर्माण केला तरच टीम इंडियाला गोलंदाजीत दबदबा दिसेल. याशिवाय पहिल्या डावात क्षेत्ररक्षणावेळी ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. पहिल्या डावात खराब क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडच्या तीन बॅटर्संनी मोठी धावसंख्या केल्याचे पाहायला मिळाले होते. बुमराहला इतर गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ देण्याचा मंत्र जपला तर टीम इंडिया हा सामना अगदी सहज जिंकू शकेल. पण जर याउलच घडलं तर सामना इंग्लंडच्या बाजूनं फिरू शकतो.