Join us

गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची मालिकेत १-१ बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 21:48 IST

Open in App

Team India Historic Win At Edgbaston : इंग्लंडच्या ज्या मैदानात आतापर्यंत एकही विजय मिळाला नव्हता त्या बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय संघाने ३३६ धावांनी इंग्लंडला पराभूत करत  परदेशातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. एवढेच नाही भारतीय संघ एजॅबेस्टनच्या मैदानात कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं फलंदाजीत धमक दाखवत ६०८ धावांचे लक्ष्य  ठेवले होते.  विक्रमी धावसंख्या उभारत खेळलेला हा डाव बॅझबॉल खेळणाऱ्या इंग्लंड संघाच्या मानसिकतेवर मोठा घाव होता. टीम इंडियाने मालिकेत आघाडीवर असलेल्या यजमान इंग्लंड संघाला आक्रमक खेळून धावा काढा, नाहीतर बचावात्मक खेळण्याचं तंत्र दाखवून मॅच ड्रॉ करून दाखवा, असं चॅलेंजच दिले होते.

जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला

ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची मालिकेत १-१ बरोबरी

 बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीप आणि मोहम्मद सिराज जोडीनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. पहिल्या डावात सिराजनं तर दुसऱ्या डावात आकाश दीप अर्धा संघ तंबूत धाडत संघाचा विजयाचा मार्ग मोकळा केला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. 

टीम इंडियानं सेट केलं होत विक्रमी लक्ष्य

बर्मिंगहॅमच्या मैदानात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूनं लागला होता. पहिल्या कसोटी सामन्याप्र्माणे इथंही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात शुबमन गिलचं विक्रमी द्विशतक आणि  यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ५८७ धावा केल्या. सिराज आणि आकाश दीप यांनी दोघांनी मिळून १० विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकच्या शतकी खेळीशिवाय जेमी स्मिथनं नाबाद १८४ धावांची खेळी केली. पहिल्या डावात १८० धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघानं दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित करत इंग्लंडच्या संघासमोर ६०८ धावांचे टार्गेट सेट केले होते. दुसऱ्या डावात शुबमन गिलच्या शतकासह केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या भात्यातून अर्धशतक पाहायला मिळाले.

दुसऱ्या डावात आकाश दीपचा 'पंजा'

डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना आकाश दीप आणि मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर आघाडी फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या डावात या जलदगती गोलंदाजांना वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवींद्र जडेजा या जोडीनंही उत्तम साथ दिली अन् टीम इंडियाने बर्मिंगहॅमचं मैदान मारलं. 

अखेर पहिला विजय मिळाला

 एजबॅस्टनच्या मैदानात भारतीय संघाने १९६७ ते २०२२ या कालावधीत ८ कसोटी सामने खेळले होते. यात १९८६ मध्ये एक सामना अनिर्णित राहाल होता. याशिवाय ७ सामन्यात भारतीय संघाच्या पदरी पराभव पदरी पडल्याचे पाहायला मिळाले, अखेर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनच्या मैदानात विजयी पताका फडकावली आहे.  शुबमन गिलसाठीही हा क्षण खास आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला विजय आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलआकाश दीपमोहम्मद सिराजबेन स्टोक्स