ENG vs IND 2nd Test Day 2 Stumps : भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेअंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात रंगला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीनंतर गोलंदाजीत छाप सोडत दुसरा दिवसही आपल्या नावे केला आहे. हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवानंतर मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाने सामन्यावर पकड मिळवल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाचा 'स्लिप'मध्ये जागता पाहरा; पहिल्या डावात इंग्लंडची बिकट अवस्था
भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावा केल्यावर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेला भेदक मारा अन् स्लिपमध्ये जागता पहारा देत क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने इंग्लंडला ८ व्या षटकात अवघ्या २५ धावांवर तीन धक्के दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात ७७ धावा केल्या होत्या. जो रुट ३७ चेंडूचा सामना करून १८ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूक याने ५३ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ३० धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ अजूनही ५१० धावांनी पिछाडीवर आहे.
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
आकाश दीपनंतर पिक्चरमध्ये आला सिराज
जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या आकाश दीपनं आपल्या दुसऱ्याच षटकात दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. त्याने बेन डकेटच्या रुपात भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली पोपलाही आकाश दीपनं खातेही न उघडता माघारी धाडले. या जोडीनं हेडिंग्लेच्या मैदानात शतकी खेळीसह टीम इंडियाला दमवलं होते. कॅच सुटल्याचा फायदा उठवत त्यांनी इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पण यावेळी भारतीय संघाने क्षेत्ररक्षणातील चुका टाळत या दोघांना खातेही न उघडता तंबूत धाडले. त्यानंतर सिराजनं सलामीवीर झॅक क्रॉउलीला १९ धावांवर चालते केले. इंग्लंडच्या संघाने आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर २५ धावांवर आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्या. फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे.