ENG vs IND 2nd Test Day 1 Stumps : बर्मिंगहॅमच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस शुबमन गिलनं गाजवला. यशस्वी जैस्वालच्या दमदार खेळीनंतर शुबमन गिलच्या भात्यातून आश्वासक खेळी आली. भारतीय संघाचे नेतृत्व करताना दुसऱ्या कसोटीत सलग दुसरे शतक झळकावत शुबमन गिलनं टीम इंडियाला मोठा दिलासा दिलाय. अर्धा संघ तंबूत परतल्यावर जड्डूनं त्याला उत्तम साथ दिली. ही जोडी जमली अन् भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर धावफलकावर ५ बाद ३०५ धावा लावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी जैस्वालचं शतक हुकलं
बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या १५ धा असताना लोकेश राहुल २ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वालनं करुण नायरच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. करुण नायर ३१ धावांवर बाद झाल्यावर यशस्वीनं कॅप्टन शुबमन गिलच्या साथीनं ६६ धावांची भागीदारी रचली. यशस्वी जैस्वाल शतकाकडे वाटचाल करत असताना बेन स्टोक्सनं त्याला ८७ धावांवर तंबूत धाडले.
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
पंत-नितीश रेड्डी स्वस्तात माघारी
यशस्वी जैस्वालच्या रुपात भारतीय संघाने १६१ धावांवर तिसरी विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी उप कर्णधार रिषभ पंत मैदानात आला. त्याने कर्णधार शुबमन गिलच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची खेळी केली. ४२ चेंडूत २५ धावांवर तो झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या नितीश कुमार अवघ्या एका धावेची भर घालून चालता झाला. २११ धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
शुबमन गिल-जडेजाची दमदार भागीदारी
अर्धा संघ तंबूत परतल्यावर शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा जोडी जमली. पहिल्या दिवसाअखेर या जोडीनं सहाव्या विकेटसाठी नाबाद ९९ धावांची भागीदारी रचली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शुबमन गिल २०१६ चेंडूत ११४ धावांवर नाबाद होता. दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजाने ६७ चेंडूत ४१ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून क्रिस वोक्सनं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. याशिवाय शोएब बशीर, ब्रायडन कार्स आणि बेने स्टोक्स यांनी आपल्या खात्यात प्रत्येकी १-१ विकेट जमा केली.