Join us

२० चोकार, ५ षटकार! १७२ मिनिटांतील बेस्ट खेळीसह हेडनं मोडला हिटमॅन रोहितचा विक्रम 

ट्रॅविस हेडनं वनडेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळी केली. या खेळीसह त्याने भारतीय संघाचा कॅप्टन अन् हिटमॅन रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:25 IST

Open in App

 ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅविस हेड आपल्या स्फोटक अंदाजातील फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात त्याने आपल्या तोऱ्यात बॅटिंग करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा अक्षरश: बुक्का पाडला. इंग्लंडच्या संघाने ठेवलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना ट्रॅविस हेडनं वनडेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळी केली. या खेळीसह त्याने भारतीय संघाचा कॅप्टन अन् हिटमॅन रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

पाहुण्या कांगारुंची १-० अशी आघाडी 

नॉटिंघहॅमच्या ट्रेंट ब्रिजच्या मैदानात गुरुवारी रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने  ४९.४ षटकात ३१५ धावा काढल्या होत्या. पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅविस हेडच्या वादळी खेळीसह हे आव्हान ६ षटका आणि ७ गडी राखून पार करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

ट्रॅविस हेडची वादळी खेळी, २० चौकार अन् पाच षटकारांसह पेश केला खास नजराणा

ट्रॅविस हेडनं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात १७२ मिनिटे मैदानात अधिराज्य गाजवत १२९ चेंडूत नाबाद १५४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २० चौकार आणि पाच उत्तुंग षटकार मारले. मार्नस लाबुशेनच्या साथीनं त्याने १४८ धावांची मोठी भागीदारी रचली.  लाबुशेन याने ६१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्याच्या भात्यातून ७ चौकारांसह दोन षटकार आले.

हेडनं मोडला हिटमॅन रोहितचा मोठा विक्रम 

आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वात मोठ्या खेळीसह ट्रॅविस हेड याने अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले. यात रोहित शर्माच्या एका मोठ्या रेकॉर्डचाही समावेश आहे. हेड ट्रेंट ब्रिजच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना इंग्लंविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज ठरलाय.  याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावे होता. जुलै २०१८ मध्ये हिटमॅनच्या भात्यातून या मैदानात इंग्लंड विरुद्ध १३७ धावांची खेळी आली होती. हेडनं या खेळीसह रोहितला मागे टाकलेच. याशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूनं इंग्लंडमध्ये केलेली ही सर्वात मोठी खेळीही ठरली.   

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाइंग्लंड