ENG vs AUS Ashes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ स्टेडियमवर खेळवण्यात आला. पहिल्या दिवसात ज्या खेळपट्टीवर १९ विकेट्स पडल्या त्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवसाच्या खेळात ट्रॅविस हेड नावाचं वादळ घोंगावलं. ऑस्ट्रेलियन बॅटरनं स्फोटक फलंदाजी करत विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या दिवशीच ८ विकेट्सनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पहिल्या डावात २१ धावांवर बाद झालेल्या ट्रॅविस हेडनं दुसऱ्या डावात तुफान फटकेबाजी केली. इंग्लंडनं ठेवलेल्या २०५ धावांचा पाठलाग करताना त्याने ८३ चेंडूत १२३ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने १६ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने विक्रमी स्ट्राइक रेटसह धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटी क्रिकेटमध्ये जे कुणालाचं जमलं नाही ते ट्रॅविस हेडनं करून दाखवलं
ट्रेविस हेड याने धावांचा पाठलाग करताना ६९ चेंडूत शतक साजरे केले. चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून आलेली ही सर्वात जलद शतकी खेळी ठरली. या कागिरीसह तो कसोटी क्रिकेटमध्ये जगात भारी खेळाडू ठरला. ट्रॅविस हेडनं इंग्लंडविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात १४८.१९ च्या स्ट्राइक रेटसह इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोचा विक्रम मोडीत काढला. याआधी कसोटीत सर्वाधिक स्ट्राइक रेटनं धावा करण्याचा विक्रम हा जॉनी बेयरस्टोच्या नावे होता. त्याने २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात १४७.८२ च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. हेड हा अॅशेस कसोटी मालिकेच्या इतिहासात ८५ चेंडूंच्या आत दोन शतके झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सर्वोच्च स्ट्राइक रेटसह धावा करणारे फलंदाज
- १४८.१९ – ट्रॅविस हेड विरुद्ध इंग्लंड, २०२५
- १४७.८२ – जॉनी बेयरस्टो विरुद्ध न्यूझीलंड, २०२२
- १३२.१४ – नॅथन अॅस्टल विरुद्ध इंग्लंड, २००२
- १२८.४२ – शाहिद आफ्रिदी विरुद्ध वेस्ट इंडिज, २००५
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवशीच संपवली मॅच
इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात १७२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १३२ धावांत आटोपल्यामुळे इंग्लंडला ४० धावांची अल्प आघाडी मिळाली. पण पिछाडीवरून ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानातील सामना आपल्या बाजूनं वळवला. इंग्लंडचा संघाने दुसऱ्या डावात १६४ धावा करत यजमानांसमोर २०५ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना ट्रॅविस हेडच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ८ विकेट राखून दुसऱ्या दिवशीच मॅच संपवली.