Join us

IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं?

Rishabh Pant Harry Brook, IND vs ENG 2025 : शुभमन गिल आणि ऋषभ पंत खूप संतापले. त्यांनी थेट पंचांकडे याबद्दल तक्रारही केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:59 IST

Open in App

Rishabh Pant Harry Brook, IND vs ENG 2025 : टीम इंडियाने कर्णधार शुभमन गिलच्या शानदार द्विशतकानंतर उत्तम गोलंदाजीच्या साथीने सामन्यावर पकड मिळवली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलने २६९ धावा केल्या, त्याआधारे भारतीय संघाने ५८७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर, वेगवान गोलंदाजांनी केवळ २५ धावांत इंग्लंडचे तीन बळी घेतले होते. पण नंतर इंग्लंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट गमावली नाही. जो रूट १८ आणि हॅरी ब्रूक ३० धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात हॅरी ब्रूकच्या एका कृतीवर कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत खूप संतापले. त्यांनी थेट पंचांकडे याबद्दल तक्रारही केली.

हॅरी ब्रूकने काय केले?

एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या पहिल्या डावात रवींद्र जाडेजाने १९ वे षटक टाकले. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक जाडेजाविरुद्ध खूप अस्वस्थ वाटत होता. दिवसाचा खेळ संपण्याची वेळही झाली होती. अशा परिस्थितीत, हॅरी ब्रूक प्रत्येक चेंडूनंतर खेळायला सज्ज होण्यासाठी वेळ घेत होता. तो जाणूनबुजून कधी ग्लोव्ह्ज नीट करायचा तर कधी हेल्मेट सेट करण्यात वेळ घालवायचा. दिवसाच्या खेळाचा वेळ वाया घालावणे हाच त्याचा हेतू होता.

पंतने पंचांकडे केली तक्रार

ऋषभ पंतला समजले की ब्रूक वेळ वाया घालवत आहे कारण जाडेजा त्याचे षटक लवकर पूर्ण करत होता. अशा परिस्थितीत ब्रुक वेळ वाया घालवण्याचे कारण शोधत होता. हॅरी ब्रूकच्या या कृतीवर ऋषभ पंतने पंचांकडे तक्रार केली. 'तो फक्त वेळ वाया घालवतोय, गोलंदाज तयार आहे. याचं काय चाललंय? प्रत्येक चेंडूवर तो असाच वेळ काढतोय,' असे पंत म्हणाला. जाडेजानेही पंचांकडे पाहिले आणि विचारले की ब्रूक असे का करत आहे? यावर पंचांनी ब्रूकला ताकीद दिला आणि मग सामना पुढे खेळवला गेला. जाडेजाचे षटक दिवसातील शेवटचे षटक ठरावे असा इंग्लंडचा डाव होता. पण जाडेजाच्या षटकानंतरही वेळ शिल्लक होता, त्यामुळे आणखी एक षटक टाकण्यात आले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५शुभमन गिलरिषभ पंत