पोर्ट आॅफ स्पेन: यष्टीरक्षक- फलंदाज ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्याच्या स्थितीत आहे. नवे काही शिकता यावे, आत्मसात करता यावे हे ध्यानात ठेवूनच या डावखुऱ्या फलंदाजाची वाटचाल सुरू असून दरदिवशी आपण क्रिकेटपटू अािण माणूस या दोन्ही क्षेत्रात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे मत दिल्लीच्या या खेळाडूने व्यक्त केले.
भारताचे पुढील सहा महिन्यांचे वेळापत्रक फार व्यस्त आहे. हा सहा महिन्यांचा कार्यकाळ तू कसा घालवशील, असा प्रश्न करताच ऋषभ म्हणाला,‘माझ्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. हा केवळ पुढील सहा महिन्यांचा प्रश्न नाही. आयुष्यातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी खेळाडू आणि माणूस म्हणून स्वत:मध्ये सुधारणा घडवून
आणू इच्छितो. असे करण्यास
मी फारच उत्सुक आहे.’ खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही त्याने ज्या प्रकारे विकेट फेकली त्यावर टीकाकारांनी चांगलेच तोंडसुख घेतले. यावर
पंत म्हणाला,‘ वैयक्तिक बोलायचे
तर प्रत्येक दिवशी मोठी
खेळी करण्याची इच्छा असते. पण क्रिजवर उतरल्यानंतर दरवेळी माझे लक्ष याकडे नसते. क्रिजवर स्थिरावल्यानंतर मी स्वत:चा बळी दिला कारण मी सामान्य क्रिकेटपटू म्हणून खेळू इच्छितो.
सकारात्मक खेळल्यामुळे माझ्या संघाला सामना जिंकता येऊ शकतो याची जाणीव आहे.’ २१ वर्षांचा हा खेळाडू पुढे म्हणाला,‘आम्ही प्रयोग करीत नसून संघात असलेल्या प्रत्येकाला खेळण्याची संधी देत आहोत. सर्वांना समान संधी मिळावी, संघात आपले स्थान काय याची जाणीव व्हावी यासाठीच संघ व्यवस्थापन काम करीत आहे.’ (वृत्तसंस्था)