दुबई : ‘मोठे फटके मारण्यासाठी बॅटचा वेग वाढविण्यावर मेहनत घेत आहे,’ असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने बुधवारी व्यक्त केले. महिला टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी जेमिमा सध्या घाम गाळत आहे. पुढील महिन्यात आॅस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकाआधी जेमिमाचे लक्ष्य बॅकफूटवरील फलंदाजी सुधारणे हेच आहे.
‘रोड टू टी२० विश्वचषक’ या कार्यक्रमात जेमिमा म्हणाली,‘मी बॅकफूटवरील फटकेबाजीवर काम करीत आहे. माझी शारीरिक क्षमता पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता. माझ्यात षटकार खेचण्याची क्षमता दिसत नसेल, मात्र मी त्यावर मेहनत घेत आहे.’ २०१८ ला आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून जेमिमाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. भारत २१ फेब्रुवारीला सिडनीत विश्वचषकाचा पहिला सामना आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. ‘आम्हाला यजमान आॅस्ट्रेलियाविरुद्ध मानसिकरीत्या कणखर व्हावे लागेल,’ असे मत तिने व्यक्त केले. आॅस्ट्रेलियात सर्वोत्कृष्ट कामगिरीचे आव्हान असेल. ‘आॅस्ट्रेलिया माझ्या आवडीचा प्रतिस्पर्धी आहे. ही लढत कौशल्यापेक्षा मानसिकतेची अधिक असेल,’ असे मत जेमिमाने व्यक्त केले.
भारतीय संघ विश्वचषकाआधी आॅस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध तिरंगी एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. आॅस्ट्रेलियात मोठ्या संख्येने चाहते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत जेमिमा म्हणाली, ‘विदेशात भारतीय चाहत्यांचे नेहमीच भरपूर प्रेम मिळते. त्यामुळे घरापासून दूर असल्याचे जाणवत नाही.’