कोईम्बतूर येथे दुलीप चषक स्पर्धेतील पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग ( West Zone vs Central Zone) असा सामना सुरू आहे. पृथ्वी शॉ व राहुल त्रिपाठी यांची अर्धशतकं व शॅम्स मुलानी व तनूष कोटीयन यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर वेस्ट झोनने २५७ धावा उभ्या केल्या. कुमार कार्तिकेयाने ६६ धावा देताना ५ विकेट्स घेऊन वेस्ट झोनचे कंबरडे मोडले. कर्णधार अजिंक्य रहाणे ८ धावांवर बाद झाला. अनिकेत चौधरीनेही दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात सेंट्रल झोनचा निम्मा संघ ७७ धावांत माघारी परतला आहे. त्यात मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नेट बॉलर आणि कोलकाता नाइट रायडर्सचा हुकमी अष्टपैलू खेळाडू याला अॅम्बूलन्समधून मैदानाबाहेर नेण्याची वेळ आली.
प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल ( ०), अजिंक्य ( ८) हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉ व राहुल त्रिपाठी यांनी वेस्ट झोनचा डाव सावरला. पृथ्वीने ७८ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या, तर राहुलने १५१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६७ धावा जोडल्या. अरमान जाफर २३ धावांवर माघारी परतला अन् पुन्हा वेस्ट झोनचा डाव गडगडला. मुलानीने ४१ व कोटियनने ३६ धावा करून वेस्ट झोनला २५७ धावांपर्यंत पोहोचवले.