Rohit Sharma On Dubai Pitch : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारतीय संघाचे सर्व सामने दुबईच्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय संघानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यावर हायब्रिड मॉडेलनुसार तोडगा काढून भारताच्या सर्व मॅचेस दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकल्यावर आता फायनलमध्ये पाऊल टाकण्यासाठी भारतीय संघ सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आम्ही आमच्या घरात खेळत नाही, असं का म्हणाला रोहित?
भारतीय संघ एकाच मैदानात सर्व सामने खेळत असल्यामुळे त्यांना अधिक फायदा मिळतो, असा सूरही उमटत आहे. पण हे बोलून उगाच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मंडळींना रोहित शर्मानं कडक रिप्लाय दिलाय. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायलचा सामना मंगळवारी, ४ मार्चला दुबईच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हे काही आमचे घर नाही. या मैदानातील खेळपट्टीवर संघाला वेगवेगळ्या आव्हानाचा सामना करावा लागतोय, असेही तो म्हणाला आहे.
एकाच मैदानात खेळत असलो तरी प्रत्येक वेळी नवे आव्हान असते
रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही साखळी फेरीतील तिन्ही सामने एकाच मैदानावर खेळलो. पण प्रत्येक वेळी संघासमोर नवे आव्हान होते. प्रत्येक सामन्यात वेगळी खेळपट्टी मिळाली. तो पुढे म्हणाला की, दुबईच्या या मैदानात चार पाच खेळपट्ट्या आहेत. सेमी फायनलचा सामना यापैकी कोणत्या खेळपट्टीवर होणार त्याची कल्पना नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांना स्विंगसाठी मदत मिळाली. पहिल्या दोन सामन्यात ते दिसले नाही. त्यामुळेच प्रत्येक मॅचमध्ये नवे चॅलेंज आहे, हे त्याने बोलून दाखवले.
सेमीची लढाई नाही सोपी, कारण..
भारतीय संघानं दिमाखात सेमी गाठली असली तरी या सामन्यात त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. त्यामुळे ही लढाई सहज सोपी नाही. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरली होती. या संघातून खेळणारा जानी दुश्मन ट्रॅविस हेडला रोखमं हे टीम इंडियासमोर आणखी एक वेगळे चॅलेंज असेल. मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरेल.