Team India New Sponsor : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असणाऱ्या BCCI ला सध्या एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बीसीसीआय आणि ड्रीम११ यांच्यातील व्यवसायिक संबंध संपुष्टात आले आहेत. ऑनलाइन गेमिंगचे प्रमोशन आणि रेग्युलेशन विधेयक मंजूर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रीम इलेव्हनशी संबंध तोडल्यानंतर बीसीसीआयनेही एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, आता भविष्यात पुन्हा कधीही अशा कंपन्यांशी व्यवसायिक संबंध जोडणार नाही किंवा काम करणार नाही. दरम्यान, आशिया कपच्या तोंडावर टीम इंडियाचा स्पॉन्सर असलेला ड्रीम११ दूर झाल्याने नवा स्पॉन्सर कोण? हा प्रश्न उभा असतानाच, चार बड्या कंपन्या स्पर्धेत असल्याचे बोलले जात आहे.
ड्रीम११ शी व्यवसायिक संबंध संपला, आता...
ड्रीम११ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ २०२३ मध्ये जोडले गेले होते आणि दोघांमधील करार २०२६ पर्यंत होता. ड्रीम११ ला २०२६ पर्यंत बीसीसीआयला ३५८ कोटी रुपये द्यावे लागले होते, परंतु आता हा करार मध्येच मोडला गेला आहे. त्यामुळे बीसीसीआयला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. बीसीसीआयचे माय११सर्कलशीही व्यवसायिक संबंध आहेत. ही कंपनी आयपीएलमध्ये एक फँटसी पार्टनर आहे. ही कंपनी एका वर्षात बीसीसीआयला बीसीसीआयला दरवर्षी १२५ कोटी रुपये देते. पण ही कंपनी देखील ऑनलाइन गेमिंगशी संबंधित असल्याने या कंपनीवरही गदा येऊ शकते. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, आशिया कपपूर्वी कोणती कंपनी बीसीसीआयला आधार देईल.
टीम इंडियाच्या स्पॉन्सरशिपसाठी बडी नावं चर्चेत
टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचे नाव असेल याचे उत्तर लवकरच मिळू शकेल. कारण रिपोर्ट्सनुसार, अनेक मोठ्या कंपन्या बीसीसीआयसोबत करार करण्यास तयार आहेत. यामध्ये टाटा, रिलायन्स, अदानी सारखी मोठी नावे समाविष्ट आहेत. टाटा आधीच आयपीएलचे प्रायोजक आहेत, तर रिलायन्स जिओ प्रसारणात सहभागी आहे. या कंपन्यांव्यतिरिक्त, ग्रो, झिरोधा यासारख्या कंपन्यादेखील करार करू शकतात. महिंद्रा आणि टोयोटा सारख्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या देखील बीसीसीआयसोबत त्यांचे व्यवसायिक संबंध जोडू शकतात. तसेच, पेप्सी देखील या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.