लंडन : आर्थिक हित डोळ्यांपुढे ठेवूनच भारत-पाकिस्तान यांच्यात योजनाबद्धरीत्या सामन्यांचे आयोजन करण्यात येते, असा आरोप इंग्लंडचा माजी कर्णधार माइक आथर्टन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर केला. खेळातील तणाव आणि एकमेकांबाबतचा द्वेष संपवायचा असेल तर उभय देशांदरम्यान सामन्यांचे आयोजन बंद करा, अशी मागणीही त्यांनी केली. क्रिकेट हा खेळ एकमेकांविरुद्ध अपप्रचाराचे माध्यम बनू नये, असे आथर्टन यांचे मत आहे.
‘द टाइम्स’मध्ये लिहिलेल्या स्तंभात आथर्टन यांचे मत असे की, आशिया चषकात जो तणाव अनुभवायला मिळाला, ते पाहून खेळाची प्रतिमा जपली जात नसल्याचे जाणवले. भारतीय खेळाडूंनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. नंतर एसीसीप्रमुख मोहसिन नकवी भारतीय संघाला मिळणारी ट्रॉफी सोबत घेऊन गेले. भारत-पाक २०१३ पासून प्रत्येक आयसीसी स्पर्धेत गटात एकमेकांविरुद्ध सामना खेळतात. त्यात ५० षटकांचे ३ विश्वचषक, ५ टी-२० विश्वचषक, ३ चॅम्पियन्स ट्रॉफी आदींमध्ये दोन्ही देश एकमेकांविरुद्ध भिडले. यादरम्यान भारत-पाक सामन्यांची अनिवार्यता निर्माण करण्यासाठी ड्राॅ योजनाबद्धरीत्या आखला जातो.
पहलगाम हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये राजकीय तणाव विकोपाला गेला. दोन्ही देश द्विपक्षीय मालिका खेळत नसल्याने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये या दोन्ही देशांदरम्यानच्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचविली जाते. यामुळेच आयसीसी स्पर्धेच्या प्रसारण हक्काचे दर गगनाला भिडलेले आहेत. २०२३-२०२७च्या टप्प्यासाठी माध्यम हक्क ३ अब्ज डॉलर किमतीत विकले गेले. त्यामुळेच यूएईमध्ये खेळाला अधिक महत्त्व नसले तरी क्रिकेटचे महत्त्व त्यांना अधिकच वाटते.
आयसीसीने स्वार्थासाठी असे धोरण राबवू नये. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांदरम्यान किमान एकतरी सामना आयोजनाची योजनाबद्ध मालिका खंडित करण्याची वेळ आलेली आहे. आशिया चषक स्पर्धेचा ड्रॉ आणि वेळापत्रक यावर नजर टाकल्यानंतर असे जाणवले की, दोन्ही संघ प्रत्येक रविवारी तीन वेळा भिडतील, असा कट रचण्यात आला होता. क्रिकेटला कुटनीतीचा भाग बनवायचे असेल तर तणाव आणि अपप्रचार विकोपाला जाऊ शकतो. स्वार्थापोटी आणि पैशाच्या लालसेपोटी सभ्य माणसांच्या या खेळात असभ्यपणाचा शिरकाव होऊ देणे योग्य नाही. यामुळे क्रिकेटचे महत्त्व कमी होण्यास वेळ लागणार नाही.
आथर्टन यांनी मागणी केली की, पुढच्या प्रसारण टप्प्यात आयसीसी स्पर्धांआधी स्पर्धेची सोडत जाहीर व्हायला हवी. यात भारत-पाक भिडणार नसतील तरी त्यांना एकमेकांविरुद्ध खेळविण्याचा अट्टाहास होऊ नये. २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकसोबतचे द्विपक्षीय संबंध संपुष्टात आणले आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि ऑलिम्पिक खेळात उभय देश एकमेकांविरुद्ध खेळतात.
भारत-पाक सामने केवळ यासाठी आयोजित केले जातात की, तणावाचा लाभ घेत टीव्ही प्रेक्षकांची संख्या वाढावी. जाहिरातींचे दर महागडे व्हावेत. या व्यवस्थेसाठी अनेकांनी मौन बाळगून पाठिंबा दिला आहे. तटस्थ स्थळाचे निमित्त पुढे करीत दुबई, अबुधाबी, अमेरिका अशा ठिकाणी सामने आयोजित करण्यामागे आयसीसीचे आर्थिक हित आहे.
- माइक आथर्टन,
माजी कर्णधार, इंग्लंड