ठळक मुद्दे फरहान अख्तरनं ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंमुंबई इंडियन्स संघात निवड झाल्यानंतर अनेकांनी केलं होतं ट्रोल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. गुरुवारी चेन्नईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात MI नं अर्जुनला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या संघात दाखल करून घेतलं. अनकॅप खेळाडूंमध्ये अर्जुनचं नाव न आल्यानं सर्व बुचकळ्यात पडले होते. परंतु मुंबई इंडियन्सनं त्याला शॉर्ट लिस्ट करून अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि लिलावातील शेवटचं नाव हे अर्जुनचंच होतं. मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली. दरम्यान, त्याच्या निवडीनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सचिन तेंडुलकरची कन्या सारा आणि आता अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर या दोघांनीही ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
"मला असं वाटतं की मला अर्जुन तेंडुलकरच्या बाबतीत हे सांगायला हवं. आम्ही एकाच जिममध्ये जातो आणि तो त्या ठिकाणी फिटनेससाठी किती मेहनत घेतो हे मी पाहिलं आहे. त्याचं ध्येय उत्तम क्रिकेटर बनण्यावर आहे. त्याच्यावर नेपोटिझ्म सारखा शब्द लादणं चुकीचं आणि क्रुर आहे, सुरू होण्यापूर्वीच त्याचा उत्साहाचा खून करू नका," असं म्हणत फरहान अख्तरनं ट्रोलर्सना सुनावलं आहे. त्यानं ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या प्रतिक्रियेचं अनेकांनी समर्थनही केलं आहे. यापूर्वीही साराही अर्जुनच्या पाठीशी उभी राहिली होती.
साराही पाठीशीअर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होताच त्याची बहीण सारा तेंडुलकर हीनं सोशल मीडियावरून त्याचे अभिनंदन केलं. सारानं इंस्टा अकाऊंटवरील स्टोरीत अर्जुनसोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिलं की, ''हे यश तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझंच आहे. मला तुझा अभिमान वाटतो.''
२१ वर्षीय अर्जुन तेंडुलकरनं मुंबईच्या सीनियर संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत हरयाणाविरुद्ध पदार्पण केलं. या स्पर्धेत दोन सामन्यांत त्यानं दोन विकेट्स घेतल्या. पण, लिलावाच्या ३-४ दिवस आधी त्यानं मुंबईत सुरू असलेल्या पोलीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत एमआयजी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना २६ चेंडूंत ७७ धावा केल्या आणि त्यात ८ षटकार व ५ चौकारांचा समावेश होता. अर्जुननं गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ४० धावा देत ३ गडीही बाद केले होते.