ललित झांबरे : कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाचे यश त्याच्या सरासरीवर मोजले जाते. जेवढी जास्त सरासरी तेवढा यशस्वी फलंदाज आणि सरासरी जेवढी सातत्याने चांगली तेवढा फलंदाज सातत्यपूर्ण. याच निकषावर अजुनही सर डॉन ब्रॅडमन हे सर्वात सफल फलंदाज मानले जातात कारण त्यांच्या धावा भलेही कमी असतील पण त्यांची सरासरी 99.94 होती ज्याच्या जवळपासही कुणी अजुनसुध्दा फिरकू शकलेले नाही.
27 फलंदाज स्पेशल

सर डॉन ब्रॕडमन हे एकमेवाद्वितीय असल्याने त्यांचा अपवाद सोडला तर इतर फलंदांजांसाठी कसोटी सामन्यांतील यशासाठी 60 धावांच्या सरासरीचा मापदंड मानण्यात येतो. या मापदंडावर किमान 10 डावानंतर 60 धावांची सरासरी हा निकष लावला तर हजारो फलंदाजांमधून केवळ 27 फलंदाज सातत्यपूर्ण सफलतेच्या बिरुदाला पात्र ठरतात आणि आश्चर्य वाटले पण या 27 फलंदाजांमध्ये कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे सचिन तेंडुलकर, रिकी पोंटींग, जेकस् कॕलिस, राहुल द्रविड, कुमार संगाकारा, महेला जयवर्धनेसारखे फलंदाज नाहीत मात्र या यादीत माईक हसी, अॕडम व्होग्स, अॕडम गिलख्रिस्ट, विनोद कांबळी व मार्नस् लाबूशेनसरखे फलंदाज आहेत.

मार्नस् लाबूश्चेन हे यादीतील सर्वात ताजे नाव आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या मालिकेतील तिन्ही सामन्यात चांगल्या धावा करुन त्याने 60 च्या वर सरासरी राखणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. आपल्या 22 व्या डावात 215 धावांची द्विशतकी खेळी करताना त्याने हा मैलाचा दगड ओलांडला.
ब्रॕडमन व सटक्लिफ अपवाद

या यादीत आपण किमान 10 कसोटी डाव खेळलेल्या फलंदाजांचा विचार करतोय पण सर डॉन ब्रॕडमन व हरबर्ट सट्क्लिफ हे त्याला अपवाद करावे लागतील. याचे कारण हे की सर डॉन यांनी आपल्या सातव्या डावात 123 धावांची खेळी केली आणि तेंव्हापासून त्यांची सरासरी जी 60 च्या वर गेली ती कधीच खाली आली नाही. 52 सामने आणि 80 डावानंतर त्यांनी निवृत्ती पत्करली तेंव्हा त्यांची सरासरी 99.94 राहिली म्हणजे सातव्या डावापासून ते 80 व्या डावाअखेर म्हणजे तब्बल सलग 73 डाव सर डॉन ब्रॕडमन यांनी 60 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या.
इंग्लंडचे हरबर्ट सटक्लिफ यांनी तर सर डॉन ब्रॕडमनसुध्दा फिके पडतील अशी कामगिरी केली. त्यांनी 54 कसोटी सामन्यात 84 डाव खेळले आणि यात पहिल्या डावापासून शेवटच्या डावापर्यंत त्यांची सरासरी कधीही 60 च्या खाली गेली नाही. कसोटी कारकिर्दीतील प्रत्येक डावात 60 च्यावर सरासरी राखणारे ते एकमेव फलंदाज आहेत. यादरम्यान त्यांनी 99.33 धावांची सर्वोच्च सरासरी गाठली होती.
सुरुवात दणक्यात, नंतर घसरण

सुनील गावसकर, जॉर्ज हेडली, माईक हसी, एव्हर्टन विक्स, सर लेन हटन, नील हार्वे, अॕडम गिलख्रिस्ट व विनोद कांबळी हे आठ फलंदाज असे आहेत की ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात तर दणक्यात केली पण पुढे ते सातत्याने सरासरी 60.च्या वर राखू शकले नाहीत. या सर्वांनी आपण निश्चित केलेल्या किमान 10 डावांच्या निकषाआधीच 60 च्यावर सरासरी गाठली होती.

सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजमध्ये अतिशय यशस्वि पदार्पण करताना पहिल्या डावापासून 21 व्या डावापर्यंत सरासरी 60 च्यावर राखली पण नंतर पुन्हा ते हा टप्पा गाठू शकले नाहीत. गिलख्रिस्टची सरासरीसुध्दा पहिले 11 डाव 60 च्यावर राहिली. जॉर्ज हेडली यांनीसुध्दा त्यांच्या पहिल्या 18 डावात 60 च्यावर सरासरी राखली.
माईक हसीची विलक्षण घसरण

ऑस्ट्रेलियच्या माईक हसीने तर चौथ्या डावात हा टप्पा ओलांडल्यावर 55 व्या डावाअखेरपर्यंत त्याची सरासरी 60 धावांच्यावरच राहिली पण नंतर तो असा ढेपाळला की तो नंतर एकदाही 60 च्यावर सरासरी गाठू शकला नाही. विव्ह रिचर्डसने आपल्या दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत 60 च्यावर सरासरी नेल्यावर पुन्हा हा टप्पा गाठायला त्याला 21वा कसोटी सामना आणि 36 व्या डावाची वाट पहावी लागली. ब्रायन लाराने 375 धावांची मोठी खेळी केली होती तेंव्हा 60 धावांच्या सरासरीचा टप्पा ओलांडण्यात तो यशस्वी ठरला होता. वेस्ट इंडिजच्या क्लाईड वॉलकाॕट यांनी अॉस्ट्रेलियाविरुध्द दोन्ही डावात 155 व 110 धावांच्या खेळी केल्या तेंव्हा त्यांच्या कारकिर्दीत ते एकदाच 60 धावांच्यावर सरासरी गाठू शकले होते.
पाँटींग आहे आगळावेगळा

याच प्रकारे रिकी पाँटींगच्या कारकिर्दीची आकडेवारी पाहिली तर तो कधीही 60 धावांच्या सरासरीचा टप्पा गाठू शकला नसल्याचे दिसेल पण 2006 च्या अॕशेस मालिकेतील अॕडिलेड कसोटीत त्याने इंग्लंडविरुध्द पहिल्या डावात 142 धावांची खेळी करताना 60 धावांच्या सरासरीला स्पर्श केला होता आणि या डावात तो नाबाद राहिला असता तर त्याची सरासरी 60 च्यावर गेली असती पण तो बाद झाल्याने त्याची सरासरी शेवटी 60 पेक्षा कमीच राहिली. आता मार्नस लाबूशेन याने सिडनी कसोटीत न्यूझीलंडविरुध्द पहिल्या डावात 215 धावा करताना 60 च्या सरासरीचा टप्पा ओलांडला.हा त्याचा 22 वा डाव होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही 59 धावा करुन त्याच्या 14 सामन्यांच्या 23 डावात आता 63.43 च्या सरासरीने 1459 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये 60 पेक्षा अधिक सरासरी गाठलेले फलंदाज (पात्रता-किमान 10 डाव)
(60 ची सरासरी गाठली तो टप्पा)
फलंदाज ---------------सामने---------डाव
हरबर्ट सट्क्लिफ----- 1------ 1
डॉन ब्रॕडमन----------- 4------ 7
सुनील गावसकर----- 5------ 10
जॉर्ज हेडली----------- 5------ 10
माईक हसी------------ 5------ 10
एव्हर्टन विक्स--------- 7------ 10
लेन हटन---------------- 7------ 10
नील हार्वे--------------- 7------ 10
अॕडम गिलख्रिस्ट------ 7------ 10
विनोद कांबळी--------- 9------ 10
चार्ली डेव्हिस---------- 6------ 12
जॕक रायडर------------ 9------ 13
अॕडम व्होग्ज----------- 9------ 14
सिड बार्नस-------------10------ 15
वॉली हॕमंड--------------11------ 16
एडी पेंटर----------------14------ 21
मार्नस लाबुशेन---------14------ 22
ब्रायन लारा-------------16------ 26
डेनिस कॉम्प्टन---------19------ 30
विव्ह रिचर्डस्-----------21------ 36
गॕरी सोबर्स--------------21------ 37
ग्रॕहम पोलॉक-----------21------ 37
क्लाईड वॉलकॉट------33------ 56
स्टिव्ह स्मिथ------------47------ 75
जॕक हॉब्ज--------------48------ 80
केन बॕरिंग्टन------------58------ 92
रिकी पोंटींग-----------107----- 178