Join us

पहिल्या दिवशी मुंबईकरांचे वर्चस्व; मिनाद मांजरेकर, श्रेयस गुरवच्या चार विकेट्स

बंगालचा कर्णधार काजी जुनैद सैफीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पाहुण्यांना भलताच महाग पडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 19:19 IST

Open in App

ठाणे : तब्बल दोन दशकांच्या कालावधी नंतर दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात सुरू असलेल्या प्रथम श्रेणी २३ वर्षाखालील सी के नायडू करंडक स्पर्धेतील बंगाल विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या दिवशी यजमान मुबंईने ४ बाद २२८ धावासह निर्विवाद वर्चस्व राखताना पहिल्या डावात १३७ धावांची आघाडी मिळवली. गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यावर फलंदाजांनीही मुबंईला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मिनाद आणि श्रेयसच्या चार विकेट्स त्यानंतर नाबाद ७८ धावांच्या अर्धशतकी खेळीसह अग्नी चोप्राने चिन्मय सुतारसह केलेली ९८ धावांची भागीदारी  हे मुंबईच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले.

बंगालचा कर्णधार काजी जुनैद सैफीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पाहुण्यांना भलताच महाग पडला. मिनाद आणि श्रेयसच्या भेदक गोलंदाजीला क्षेत्ररक्षकांचीही तेवढीच तोलामोलाची साथ मिळाल्याने बंगालचा पहिला डाव अवघ्या ९१ धावांवर आटोपला. रणजोतसिंग खरीया(३४), काझी जुनैद सैफी (१६) आणि  सौरव हलदरचा (१२) अपवाद वगळता बंगालचे इतर फलंदाज खेळपट्टीवर केवळ हजेरी लावून गेले.

पाहुण्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना मिनादने १४ आणि श्रेयसने २१ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स मिळवल्या. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी कुठल्याही प्रकारची घाई केली नाही. अमन खान ( ४८) आणि भुपेंन लालवानी या  मुंबईच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार हार्दिक तामोरे (४१) , अग्नी चोप्रा नाबाद ७८ आणि चिन्मय सुतारने नाबाद ३१ धावा करत पाहुण्यांना मोठे यश मिळू दिले नाही.

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात फक्त क्रिकेट खेळले जावे

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह हे क्रिकेटसाठी उत्तम अशी खेळपट्टी असलेले मैदान आहे, या मैदानात फक्त क्रिकेटच खेळले पाहिजे. उत्तम असे व्यासपीठ ठाण्यातील क्रिकेटप्रेमीना या खेळपट्टीच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे.  अनेक वर्षानंतर या ठिकाणी प्रथम श्रेणीचा सामना होत असून यापुढेही असे सामने येथे खेळविले गेले पाहिजे असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेगसरकर यांनी व्यक्त केले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या  या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन नाणेफेक करुन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

टॅग्स :मुंबईठाणेमहाराष्ट्र