लंडन : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाआधी तणावात असलेल्या हनुमा विहारी याने राहुल द्रविड याच्याशी फोनवरून चर्चा केल्याने दिलासा मिळून इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकताना भारताला संकटातून बाहेर काढू शकल्याचे म्हटले आहे.
विहारीने ५६ धावा केल्या व रवींद्र जडेजासह (नाबाद ८६) ७७ धावांची भागीदार केली. विहारी म्हणाला, ‘मी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाआधी द्रविड यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यामुळे माझी अस्वस्थता मिटली. ते महान क्रिकेटर आहेत आणि फलंदाजीतील त्यांच्या सल्ल्याचा मला खूप लाभ झाला. त्यांनी मला म्हटले की, ‘तुझ्याकडे क्षमता आहे, मानसिक कणखरता आहे व ‘टेम्परामेंट’ आहे. या कामगिरीचे मी त्यांना श्रेय देऊ इच्छितो कारण भारत अ संघासोबत माझा प्रवास खूप महत्त्वाचा होता. त्यांच्या मदतीमुळे मी चांगला खेळाडू बनू शकलो.’
जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉडला खेळताना आपण नर्व्हस होतो, असे विहारी म्हणाला. तो म्हणाला, ‘सुरुवातीला मला दबाव जाणवला; परंतु स्थिरावल्यानंतर मी नर्व्हस नव्हतो. ते जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत आणि दोघांनी एकूण ९९० विकेटस् घेतल्या आहेत. मी सकारात्मक दृष्टिकोनातून खेळू इच्छित होतो. विशेषत: विराट खेळपट्टीवर असल्यास फक्त स्ट्राईक रोटेट करून भागीदारी फुलते.’ त्याने विराट कोहलीची प्रशंसा करताना म्हटले, ‘दुसऱ्या बाजूने विराट खेळत असल्याने माझे काम सोपे झाले. त्याच्या सल्ल्याची मला खूप मदत झाली.’ (वृत्तसंस्था)