टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघात स्थान न मिळाल्याने त्याने आपले दुःख प्रथमच उघडपणे व्यक्त केले. निवडकर्त्यांच्या या निर्णयामुळे झालेली निराशा शमीने एका निवेदनातून बोलून दाखवली, पण त्याचसोबत त्याने आपल्या चाहत्यांना आपल्या तंदुरुस्तीबद्दलही महत्त्वाची अपडेट दिली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याबद्दल विचारले असता, शमीने म्हणाला की, 'हे सर्व माझ्या हातात नाही. जर निवडकर्त्यांना आणि संघ व्यवस्थापनाला वाटत असेल की मी संधीला पात्र आहे, तर मी नक्कीच खेळेन. मी तंदुरुस्त आहे आणि सतत सराव करत आहे." या विधानातून निवडकर्त्यांच्या निर्णयावर त्याचा थेट कोणताही आक्षेप नसला तरी, संघात स्थान न मिळाल्याने तो किती दुःखी आणि निराश आहे, हे स्पष्ट होते. त्यानंतर शामीने तो पूर्णपणे फीट असल्याचे सांगत त्याच्या तंदुरुस्तीबद्दल पसरलेल्या चर्चांवर पूर्णविराम दिला. नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने ३५ षटके गोलंदाजी केली आणि त्याला कोणतीही समस्या जाणवली नाही. तो नेहमीप्रमाणे कठोर परिश्रम करत राहील, असे त्याने चाहत्यांना आश्वासन दिले.
मोहम्मद शमीच्या या विधानानंतर आता चाहत्यांचे लक्ष त्याच्या रणजी ट्रॉफीतील कामगिरीकडे लागले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तो कशी आग ओकतो आणि टीम इंडियामध्ये आपले स्थान पुन्हा मिळवतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले असले तरी, ३५ वर्षीय शमी आता स्थानिक क्रिकेटमध्ये आपला दम दाखवण्यास सज्ज झाला आहे. तो २०२५-२६ रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करेल आणि याच माध्यमातून टीम इंडियामध्ये परतण्याची त्याला आशा आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया
एकदिवसीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर(उपकर्णधार) विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
टी-२० संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार) अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.