Join us

Dilshan Madushanka ODI Hattrick: हॅटट्रिकसह मॅच फिरवत पठ्या मंलिंगा-चमिंडा वासच्या क्लबमध्ये पोहचला

Dilshan Madushanka ODI Hattrick : श्रीलंकेकडून हॅटट्रिकचा डाव साधणारे गोलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:00 IST

Open in App

Dilshan Madushanka ODI Hattrick : झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) याने आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडली. हरारेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधत त्याने श्रीलंकेच्या दिग्गजांच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. श्रीलंकेकडून वनडेत हॅटट्रिकची कमाल करुन दाखवणारा तो आठवा गोलंदाज ठरला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शेवटच्या षटकात भेदक मारा, हॅटट्रिकसह मॅच फिरवली

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात १० धावांचा बचाव करताना दिलशान मुदशंका याने तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. डावखुऱ्या हाताच्या जलदगती गोलंदाजाने आधी ९२ धावांवर खेळणाऱ्या सिकंदर रझा याची विकेट घेत सामना श्रीलंकेच्या बाजूनं फिरवला. त्यानंतर ब्रँड इवान्स आणि नगारवा यांच्या रुपात दोन विकेट्स घेत त्याने हॅटट्रिक पूर्ण केली. वनडेच्या इतिहासात ११ व्या वेळी श्रीलंकन गोलंदाजाने हॅटट्रिकचा डाव साधला आहे.  लसिथ मलिंगा आणि चमिंडा वास या दिग्गज गोलंदाजांनी वनडेत एकापेक्षा अधिक वेळा ही कामगिरी करुन दाखवलीये. पाच विकेट्स हातात असताना अखेरच्या षटकात झिम्बाब्वेला १० धावांची गरज होती. मदुशंकानं हॅटट्रिकसह मॅच फिरवली. त्याने या सामन्यात १० षटकात ६२ धावा खर्च करताना ४ विकेट्स घेतल्या. 

VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...

श्रीलंकेकडून हॅटट्रिकचा डाव साधणारे गोलंदाज

  • चमिंडा वास विरुद्ध झिम्बाब्वे (२००१); बांगलादेश (२००३)
  • लसिथ मलिंगा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२००७); केनिया (२०११); ऑस्ट्रेलिया (२०११)
  • फरवीज महारूफ विरुद्ध भारत (२०१०)
  • थिसारा परेरा विरुद्ध  पाकिस्तान (२०१२)
  • वानिंदु हसरंगा विरुद्ध झिम्बाब्वे (२०१७)
  • शेहान मदुशंका - विरुद्ध बांगलादेश  (२०१८)
  • महेश तीक्षणा विरुद्ध  न्यूझीलंड (२०२५)
  • दिलशान मदुशंका - विरुद्ध  झिम्बाब्वे (२०२५)

धावांचा पाठलाग करताना जवळ पोहचल्यावर अडखळला झिम्बाब्वेचा संघ 

पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंगची वेळ आल्यावर निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २९८ धावा करत घरच्या मैदानात खेळणाऱ्या झिम्बाब्वेसमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ८ विकेट्सच्या मोबदल्या २९१ धावांपर्यंत मजल मारू शकला.  

 

टॅग्स :श्रीलंकाझिम्बाब्वेआयसीसी