Mumbai Indians New Captain Hardik Pandya ( Marathi News ) : पाच वेळचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. ट्रेड विंडोमध्ये MI फ्रँचायझीने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले. या ट्रेडिंगसाठी मुंबई इंडियन्सने भरपूर पैसा ओतल्याची चर्चा आहे. हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतल्यानंतर फ्रँचायझीने रोहित शर्माकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली आणि हार्दिकला कॅप्टन बनवले. मला कर्णधार बनवत असाल तर मी येतो... अशी अट हार्दिकने MI कडे ठेवल्याची चर्चा रंगली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सने या निर्णयावर टीका केला. काल हार्दिकला पहिल्याच पत्रकार परिषदेत या प्रश्नाचा सामना करावा लागला आणि त्याचा चेहरा कावरा बावरा झाला...
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतल्याचा आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, “फारच भारी वाटतेय, आणि का वाटू नये? मी माझा प्रवास इथून सुरू केला आणि दहा वर्षांनंतर मी या टीमचे नेतृत्व करत असेन असा विचार स्वप्नातदेखील केला नव्हता. ही भावना सुखावणारी आहे. मी या सीझनसाठी आणि ज्या जुन्या खेळाडूंसोबत खेळत होतो त्यांच्यासोबत खेळायला खूप उत्सुक आहे. आम्ही एकत्र खूप यशदेखील पाहिले आहे.”
या कर्णधारपदामुळे त्याच्या आणि रोहित शर्माच्या नात्याबाबत अनेक प्रश्न विचारले गेले. परंतु हार्दिकने त्यांना उत्तरे दिली. “आमचे नाते कधीही बदलणार नाही कारण मला जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तो सोबत असेलच. या वेळी तो (रोहित) भारतीय कर्णधार असल्यामुळे मला मदत होतेय कारण या टीमने त्याच्या हाताखाली प्रचंड यश मिळवलेले आहे. त्याने ज्या सर्वांची सुरूवात केली होती ते सर्व मी इथून पुढे नेणार आहे. मी संपूर्ण एमआय करियरमध्ये त्याच्या हाताखाली खेळलेलो असल्यामुळे काहीही वेगळे किंवा विचित्र वाटणार नाही. मला माहीत आहे की संपूर्ण सीझनमध्ये त्याचा हात माझ्या खांद्यावर नक्कीच असेल.”
पण, जेव्हा पत्रकारांनी रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यामागचं नेमकं कारण काय असे विचारले तेव्हा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि हार्दिक एकमेकांकडे पाहत राहिले. त्याच्या पुढे जेव्हा हार्दिकला तू कॅप्टनची अट ठेवलेलीस का हे विचारल्यावर तर हार्दिक कावराबावरा झाला.