Virat Kohli Instagram Posts: यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीचा RCB संघ दमदार कामगिरी करत आहे. विराट कोहलीदेखील सध्या दमदार फॉर्मात आहे. कोहलीच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि संघही जिंकत आहे. पण याच दरम्यान अचानक विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची चर्चा रंगली आहे. याचे कारण फारच वेगळे आहे. सहसा एखादी नवी पोस्ट किंवा फोटो टाकल्याने इन्स्टाग्राम अकाऊंटची चर्चा होते, पण यावेळी कोहलीच्या बाबतीत हे पूर्णपणे विरूद्ध आहे. ज्याद्वारे विराट कोहली कोट्यावधींची कमाई करत होता, त्याच पोस्ट त्याने डिलीट केल्याची चर्चा आहे.
इंस्टाग्रामवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंपैकी एक असलेला विराट कोहली अनेकदा या प्लॅटफॉर्मवर आपल्या फोटोंसह जाहिराती पोस्ट करत असतो. विराटचे सध्या 271K फॉलोअर्स आहेत. विराट कोहलीच्या प्रत्येक पोस्टवर अनेक लाइक्स, कमेंट्स असतात. याच कारणास्तव कोहली इन्स्टाग्रामद्वारे अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती पोस्ट करत असतो. यातून तो कोट्यवधींचे उत्पन्न मिळवतो. पण आता कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या जाहिरातीच्या पोस्ट अचानक गायब झाल्या आहेत, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
गेल्या दीड वर्षात कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त ब्रँड एंडोर्समेंट पोस्ट केल्या होत्या. तो क्रिकेट सामन्याशी किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणतेही फोटो पोस्ट करत नाही. गेल्या काही दिवसांपासून ही बाब चर्चेत आली होती आणि चाहते याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसले होते. पण आता अचानक त्याच्या अकाउंटवरून या जाहिरातीच्या पोस्ट गायब झाल्या आहेत आणि फक्त जुने फोटो दिसत आहेत, ज्यात फक्त तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसत आहेत.
नेमके सत्य काय?
खरी गोष्ट अशी आहे की कोहलीने या पोस्ट डिलीट केलेल्या नाहीत, तर इन्स्टाग्रामच्या एका फीचरद्वारे त्या वेगळ्या केल्या आहेत. कोहलीच्या बहुतेक एंडोर्समेंट पोस्ट व्हिडिओ किंवा रीलच्या स्वरूपात असतात आणि आता त्याने इंस्टाग्रामच्या फीचरच्या मदतीने त्या मुख्य पेजपासून वेगळ्या केल्या आहेत. आता त्याचे हे व्हिडिओ फक्त रील सेक्शनमध्ये दिसत आहेत, ज्यावरून असे दिसून येते की त्याने कोणताही व्हिडिओ डिलीट केलेला नाही. यामुळे, त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या मुख्य पेजवर फक्त वैयक्तिक फोटो दिसत आहेत. तसेच, काही जाहिराती दिसत नाहीत त्या त्याने डिलीट न करता अर्काईव्ह केल्या असल्याचीही शक्यता आहे. तसेच काहींचा त्याच्याशी करार संपला असल्याचीही चर्चा आहे.