- सौरव गांगुली
आशिया चषकाच्या सुरुवातीला भारताला हाँगकांग आणि पाकिस्तानविरुद्ध पाठोपाठ सामने खेळायचे आहेत. स्पर्धेला उन्हाचा तडाखा बसत असल्याचे बांगला देश- श्रीलंका लढतीदरम्यान जाणवले. दोन दिवस दोन सामने कठीण ठरू शकतात. पण हाँगकाँगविरुद्ध मंगळवारी सुरुवातीचा सामना जड जाणार नाही, अशी आशा आहे. संपूर्ण लक्ष भारत- पाक लढतीवर आहे. उभय संघ साखळीत दोनदा खेळणार असून अंतिम फेरीत पोहचल्यास तीनदा खेळू शकतील. बांगलादेशने सलामीला श्रीलंकेला ज्या पद्धतीने नमविले ते पाहता अन्य संघात फायनल अभावानेच होऊ शकेल, असे मला वाटते.
गेल्या दहा वर्षांत पाकविरुद्ध सामन्यावर भारताने वर्चस्व गाजविले असले तरी गतवर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकने भारताला नमविले. त्यामुळेच बुधवारच्या सामन्यात उभय संघांना विजयाची समान संधी असेल. कोच मिकी आर्थर यांच्या मार्गदर्शनात पाक संघ सुधारणा करीत आहे. पाकने नेहमी प्रतिभा निर्माण केली पण त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यात व्यवस्थापन कमी पडले.
भारत येथे विराटच्या अनुपस्थितीत खेळेल. तो आधारस्तंभ असला तरी त्याच्या गैरहजेरीतही संघ मजबूत आहे. धवन आणि रोहितवर धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी असेल. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर नव्या चेहऱ्यांना प्रतिभा सिद्ध करण्याची संधी राहील.
पाक संघ पाटा खेळपट्टीवर मोठ्या धावा काढण्यात पटाईत आहे.अशावेळी भारतीय जलद मारा सावध असायला हवा. बुमराह आणि भूवी यांनी या खेळपट्टीवर शिताफीने मारा केल्यास प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या तोंडाला फेस आणू शकतात. धोनीसाठी ही मालिका महत्त्वाची असेल. इंग्लंडमधील वन डे मालिकेत अपयशी ठरलेल्या माहिकडे धावांची भूक अद्याप कायम असल्याचे सिद्ध करण्याची संधी आहे. त्याने फटकेबाजीचे कौशल्य सुरूच ठेवावे.
संघात पंतचा समावेश नसल्याचे मला आश्चर्य वाटले. ओव्हलवरील त्याच्या शतकाआधी आशिया चषकासाठी संघ निवडण्यात आला होता. कसोटीतील त्याची फलंदाजी पाहून वन डे साठी पंत सज्ज असल्याचे दिसत होते. बुधवारच्या भारत- पाक सामन्याची उत्कंठा शिगेला असताना आशिया चषक जिंकण्यासाठी केवळ एक सामना जिंकून भागणार नाही, संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजविणारा संघ स्पर्धा जिंकू शकेल. (वृत्तसंस्था)