इंदूर : पहिली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर शिखर धवनला सलामीवीर फलंदाजांच्या शर्यतीत लोकेश राहुलला पिछाडीवर सोडण्यासाठी एक लढत कमी मिळणार आहे. मंगळवारी येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या भारताच्या दुस-या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तो फॉर्मात असलेल्या राहुलच्या तुलनेत शानदार कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारा धवन ३५ वर्षांचा असून राहुल सध्या केवळ २७ वर्षांचा आहे. त्यामुळे यंदा होणा-या टी२० विश्वकप स्पर्धेत आपले स्थान निश्चित करण्यासाठी दिल्लीच्या धवनकडे फार वेळ शिल्लक नाही.
डावखुरा धवनचा स्ट्राईक रेट गेल्या काही दिवसांमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, राहुलने मिळालेल्या संधीचा पूर्ण लाभ घेतला आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सहा डावांमध्ये एक शतक व तीन अर्धशतके फटकावली. कर्णधार विराट कोहलीनेही स्पष्ट केले की, ‘श्रीलंकेविरुद्ध विश्रांती मिळाल्यानंतर रोहित शर्मा ज्यावेळी पुनरागमन करेल त्यावेळी धवन व राहुल यांच्यापैकी कुणा एकाची निवड करणे सोपे राहणार नाही.’ कोहलीने अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.
मनीष पांडे व संजू सॅमसन यांना पहिल्या लढतीत अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ प्रयोग करीत आहे, पण संघ व्यवस्थापनाने अद्याप पांडे व सॅमसन यांना संधी दिलेली नाही. चार महिन्यांनंतर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमाची सर्वांना प्रतीक्षा होती. मंगळवारी इंदूरमध्ये बुमराहला संधी मिळण्याचे जवळपास निश्चित आहे. येथे वातावरण चांगले राहणार असल्याचा अंदाज आहे. होळकर स्टेडियममध्ये आतापर्यंत केवळ एक टी२० आंतरराष्ट्रीय सामना झाला. त्यावेळी भारताने श्रीलंकेला ८८ धावांनी नमवले होते. श्रीलंका संघ भारताविरुद्ध १० वर्षांहून अधिक कालावधीपासून द्विपक्षीय मालिका जिंकण्यात अपयशी ठरला आहे.
>मॅथ्यूजच्या निवडीकडे लक्ष
कर्णधार लसिथ मलिंगासह संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजला गुवाहाटीत अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. लंकेने तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज व दोन फिरकीपटूंना संधी दिली होती. त्यामुळे मंगळवारी मॅथ्यूजच्या निवडीबाबत उत्सुकता आहे.
>प्रतिस्पर्धी संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, रिषभ पंत, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वाशिंगटन सुंदर.
श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनुष्का गुणतिलक, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, कुसाल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदू हसरंगा, लाहिरु कुमारा, कुसाल मेंडिस, लक्षण संदाकन आणि कासुन रजिता.