Join us

Devon Conway Century : पदार्पणात 'द्विशतक'; २ वर्षांत ५० वेळा बॅटिंग अन् झिम्बाब्वेविरुद्ध 'अच्छे दिन'

द्विशतकासह झोकात पदार्पण, चार शतकानंतर 'तलवार म्यान'; अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:30 IST

Open in App

Devon Conway Test Century : न्यूझीलंडचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात अवघ्या १२५ धावांत आटोपला. त्यानंतर डेवॉन कॉन्वेनं म्यान केलेली तलवार काढली अन् कसोटी कारकिर्दीतील आपले ५ वे शतक झळकावले. झिम्बाब्वे दौऱ्यावरील ही खेळी किवी बॅटरसाठी 'अच्छे दिन' दाखवणारी अशीच होती. यामागचं कारण जवळपास दोन वर्षांनी त्याचा शतकी दुष्काळ संपलाय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाचव्या शतकासह पार केला २००० धावांचा टप्पा

झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात डेवॉन कॉन्वेनं न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करताना १४३ चेंडूत शतक साजरे केले. कसोटी कारकिर्दीतील पाचव्या शतकासह त्याने २८ व्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील २००० धावांचा पल्लाही गाठलाय. याआधी कॉन्वेनं २०२३ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती.  

आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!

द्विशतकासह झोकात पदार्पण, चार शतकानंतर 'तलवार म्यान'

डेवॉन कॉन्वे याने २०२१ मध्ये क्रिकेटची पंढरी अर्थात लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळला होता. इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यात त्याने ३४७ चेंडूत २०० धावांची खेळी साकारली होती. कसोटी पदार्पणात द्विशतकी खेळी करणारा तो क्रिकेट जगतातील मोजक्या ७ फलंदाजांपैकी एक आहे. पण २०२३ पासून त्याच्या भात्यातून अपेक्षित खेळी काही पाहायला मिळाली नाही. ५० वेळा तो बॅटिंगला आला, पण सेंच्युरीचा डाव साधणं त्याला काही जमलं नाही. अखेर दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध न्यूझीलंडचा हा पठ्या पेटून उठला आहे. 

न्यूझीलंडच्या संघाने ही मालिका २-० जिंकली तरी....

पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने ९ विकेट्सनी विजय नोंदवला होता. डेवॉन कॉन्वेच्या दमदार खेळीच्या जोरावर दुसऱ्या सामन्यावरही किवींनी मजबूत पकड मिळवली असून हा सामनाही ते सहज खिशात घालतील असे दिसते. न्यूझीलंडच्या संघाने ही मालिका २-० अशी जिंकली तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याचा त्यांना फायदा होणार नाही. कारण झिम्बाब्वे हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र असलेल्या संघामध्ये नाही.

टॅग्स :न्यूझीलंडझिम्बाब्वेआयसीसी