सार्वजनिक ठिकाणी एखादा क्रिकेटपटू दिसला तर त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडणं, फोटो, सेल्फी घेण्यासाठी गर्दी होणं ही बाब भारतात काही नवी नाही. पण बऱ्याचदा चाहत्यांची अशी गर्दी क्रिकेटपटूंसाठी त्रासदायक ठरते. त्यातील काही चाहते तर खेळाडूंचा पिच्छाच पुरवतात. त्यामुळे खेळाडूंचीही चिडचिड होते. असाच प्रकार हल्ली भारताच्या एका स्टार क्रिकेटपटूसोबत घडला आहे. वारंवार बजावल्यानंतरही चाहत्याने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू ठेवलेल्या वैतागलेल्या या क्रिकेटपटूने या चाहत्याकडील फोन हिसकावून फेकून दिला.
ही घटना भारताचा स्टार क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहसोबत घडली आहे. तसेच चाहत्यासोबत झालेल्या वादावादीनंतर बुमराहने त्याचा फोन हिसकावून फेकल्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. तसेच संतापाच्या भरात बुमराहने केलेल्या या वर्तनावर टीकाही होत आहे.
विमानतळावरील चेन इनच्या लाईनमध्ये एक चाहता जसप्रीत बुमराहचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मात्र त्याने त्यासाठी पूर्वपरवानगी घेतली नव्हती. आपला व्हिडीओ रेकॉर्ड होतोय हे पाहिल्यावर बुमराहने या चाहत्याला रेकॉर्डिंग बंद करण्यास सांगितलं. मात्र या चाहत्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे संतापलेल्या जसप्रीत बुमराहने त्या चाहत्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला. दरम्यान, कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.
जसप्रीत बुमराहने केलेल्या या वर्तनावर काही चाहत्यांकडून टीकेची झोड उठत आहे. जसप्रीत बुमराहचं वर्तन सन्माननीय नव्हतं, असं एका चाहत्यानं लिहिलं आहे. तर आऊट ऑफ फॉर्म असलेला बुमराह आपला राग बिचाऱ्या फॅन्सवर काढत आहे, असे आणखी एका युझरने म्हटले आहे. तर काही जणांकडून बुमराहने केलेल्या कृतीचं समर्थनही केलं जात आहे. तो चाहता अशी वागणूक देण्याच्याच पात्रतेचा होता. बुमराहने त्याला वारंवार इशारा दिला तरी तो ऐकत नव्हता. सेलिब्रिटींची सुद्धा काही पर्सनल स्पेस असते. तिचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे या युझरने लिहिले.